महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती
- आदित्य गोखले
- Dec 16, 2022
- 8 min read
Updated: Apr 17, 2023
राजाराम महाराजांच्या निधनानंतर (३ मार्च १७००) स्वराज्याची सगळी सूत्रे त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई ह्यांनी ताब्यात घेतली. आपला ५ वर्षाचा पुत्र शिवाजीला तख्तावर बसवून सगळा कारभार त्यांनी स्वतःकडे घेतला. तो काळ अतिशय महाकठीण आणि निर्वाणीचा होता. औरंगजेब स्वराज्याचा कायमचा अंत करण्यासाठी इरेला पेटला होता. अशा परिस्थितीत पुढच्या ५ ते ६ वर्षांची हकीकत बघितली तर ह्या काळात मराठा फौजेनी थोडी वेगळी युद्धनीती अवलंबली होती असे लक्षात येते.
औरंगजेबाची किल्ले मोहीम
इसवी सन १७०० मध्ये राजाराम राजेंच्या निधनाच्या वेळी सातारा किल्ल्याला वेढा पडला होता.औरंगजेबाच्या किल्ले जिंकणे मोहिमेची ही सुरुवात होती. ह्या मोहिमेत तो स्वतः सैन्याबरोबर प्रत्येक वेढ्यात सामील होऊन सैन्याचे संचालन करत होता. स्वराज्याचा आत्मा असलेले हे किल्ले घेऊन स्वराज्य संपवण्याचा त्याचा इरादा होता. सातारा किल्ल्याला डिसेंबर १६९९ मध्ये वेढा पडल्या पासून किल्ल्यावरच्या फौजेनी प्राण पणाला लावून ४-५ महिने लढा दिला. मोगलांनी अनेक प्रयत्न केले - बुरुजाखाली सुरुंग लावून बुरुज उडवले, चौफेर हल्ला चढवला तरी किल्ला काही काबीज होईना. शेवटी परिस्थिती निकराची झाली तेव्हा महाराणींच्या धोरणानुसार किल्लेदाराने मोगलांशी तहाची बोलणी उघडली आणि अखेर २१ एप्रिल १७०० ला किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला.(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४३) तिथून मोगलांचा मोर्चा वळाला तो साताराच्या जवळच्या परळीच्या किल्ल्याकडे(सज्जनगड). परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी किल्ला जमेल तेवढा वेळ लढवून अखेर रक्कम घेऊन बोलणी करून किल्ला मोगलांच्या हवाली केला (मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४३ , मुंतुखाब-उल-लुबाब - औरंगजेब राजवट वर्ष ४३, ग.प्र.शकावली). मराठा शिबंदीकडून परळीचा किल्ला मोगलांनी ९ जून १७०० ला घेतला (मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४३) असे २ किल्ले घेई पर्यंत पाऊस चालू झाला आणि मोगल फौज माघारी माणदेशात छावणीस आली (माणदेश-खटाव - साताऱ्याच्या पूर्वेला) पाऊस संपल्यानंतर औरंगजेबाचा मोर्चा वळाला अतिशय महत्वपूर्ण आणि बेलाग अशा पन्हाळगडाकडे !!! साधारण नोव्हेंबर-डिसेंबर १७०० मध्ये शाहजादा बेदरबख्त आणि जुल्फिकारखान ह्यांनी पन्हाळ्याला वेढा घातला(ग.प्र.शक). वेढा सुरु झाल्यानंतर २ महिन्याने म्हणजे ९ मार्च १७०१ ला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४५) औरंगजेब स्वतः ह्या वेढ्यात शामिल झाला(ग.प्र.शक). खुद्द औरंगजेब, रुहुल्लाखान, शाहजादा बेदरबख्त, जुल्फिकारखान असे मातब्बर आता ह्या वेढ्यात शामिल होते. गडावरून जशास तसे उत्तर दिले जात होते. भुयार खणणे, सुरुंग लावणे, तर्बीयत खानाचा तोफखाना ह्यापैकी कुठलीही युक्ती किल्ल्यातल्या मराठी फौजेपुढे चालेना. त्यावेळी वेढ्यात प्रत्यक्ष हजर असलेल्या भीमसेन सक्सेना च्या मते वेढ्यावर वारंवार बाहेरून सुद्धा हल्ले होत होते. मोगलांच्या छावणीत हेवे-दावे, कुरबुरी चालू झाले होते. शेवटी शाहजादा कामबक्ष आणि तर्बीयत खानाला पुढे घालून औरंगजेबाने बोलणी चालू केली - २८ मे १७०१ ला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४४) शेवटी ५५ हजार रोख घेऊन पन्हाळा-पावनगड मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला (ग.प्र.शक)
पुन्हा पावसाळा - पुन्हा विश्रांतीनंतर ह्यावेळी औरंगजेबाने मोठी मोहीम काढली - सह्याद्रीच्या ऐन कुशीत वसलेल्या विशाळगडला वेढा घालायच्या इराद्याने त्याने कूच केली. त्यावेळी महाराणी ताराबाई आणि छोटे शिवाजी राजे विशाळगडला होते - त्यांनी लगेच विशाळगडहून आपला मुक्काम प्रतापगडला हलवला. पन्हाळा जिंकताना एवढे कष्ट घेतलेल्या मोगली फौजेला विशाळगड म्हणजे तर अशक्यच कामगिरी होती. ह्या वेढ्यात मराठा फौजेनी, सह्याद्रीनी आणि पावसानी मोगली फौजेचे अतोनात हाल केले. विशाळगडाची फौज परशुरामपंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांना काहीच दाद देईना. सह्याद्रीच्या त्या रौद्र भागात वेढ्यातल्या फौजे वर बाहेरून छुपे हल्ले करून त्यांची दाणादाण उडवण्यास सुरवात झाली. ह्या भागात अडकलो आणि पाऊस चालू झाला तर एकही माणूस परत छावणीला परत जाणार नाही हे औरंगजेबने ओळखले असणार. कित्येक महिने जाऊनही किल्ला घेण्यात अपयश आल्यावर औरंगजेबाने शाहजादा बेदरबख्त मार्फत वाटाघाटी चालू केल्या(मुंतुखाब-उल-लुबाब - औरंगजेब राजवट वर्ष ४६) . २ लाख रक्कम घेऊन परशुराम पंतांनी किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला (ग.प्र.शक) विशाळगड कधी मोगलांकडे सुपूर्द केला ह्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत - मस्सीर मध्ये ७ जून १७०२ , मंतुखाब मध्ये १६ जून १७०१ ?? , ग.प्र.शक मध्ये ५ जून १७०२. सहा महिने मराठ्यांचा तडाखा खाल्लेली मोगली फौज जेव्हा विशाळगड घेऊन छावणीकडे निघाली तेव्हा मधेच त्यांना सह्याद्रीच्या प्रलयंकारी पाऊसाने गाठले !!!! पावसाळ्यात नद्या-ओढे पार करताना मोगलांचे खूप मोठे नुकसान झाले. किती तरी उंट, घोडे, सैनिक, रसद, कपडे, मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेले. ह्या पावसातही मराठा फौजेनी अधून-मधून हल्ले करत मोगल सैन्याला हैराण करून सोडले होते.
मोहिमेचा पुढचा टप्पा होता किल्ले कोंढाणा - डिसेंबर १७०३ ला कोंढाण्याला वेढा पडला. तोफांना ही न जुमानणारा हा किल्ला साध्या सैनिकांना घेणं अशक्य आहे ह्याची पूर्ण जाणीव औरंगजेबाला झाली. तेव्हा नेहमीच्या पद्धतीने त्याने किल्ल्यातल्या शिबंदीशी वाटाघाटी चालू केल्या(तारिक-ए-दिलकुशा - ). पन्नास लाख किंमतीच्या मोबदल्यात(ग.प्र.शक). किल्ला ८ एप्रिल १७०३ ला मोगलांना सोपवण्यात आला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४७). कोंढाण्यानंतर राजगडला विळखा पडला. पावसाळ्यानंतर नोव्हेंबर च्या महिण्यात राजगड मोहिमेची मोगलांची तयारी चालू झाली असे नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातल्या अखबारांवरून दिसते. ४ डिसेंबर १७०३ ला औरंगजेबाने किल्ल्यावर हल्ला करण्याचे फर्मान हमीदुद्दीन खान आणि तर्बीयत खान ह्यांना दिले(मोगल दरबारची बातमीपत्रे - ३). इथे तर मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली. पराक्रमी सरदार संताजी सिलिंबकर ह्यांनी मोगलांचे आक्रमण रोखून धरले होते पण सुवेळा माचीजवळ तोफगोळा लागून ते धारातीर्थी पडले(राजवाडे खंड १७ - २९). त्या नंतरसुद्धा शिबंदीने शर्थीने किल्ला लढवला. शेवटी किल्ला झुंजवणे अत्यंत कठीण झाल्यावर वाटाघाटी चालू झाल्या. सर्व शिबंदीला सुखरूप वाट मिळण्याच्या अटीवर राजगड १६ फेब्रुवारी १७०४ ला मोगलांच्या हवाली करण्यात आला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४८). राजगड घेतल्यावर थोडा ही वेळ न घालवता मोगल सैन्याचा मोर्चा तोरणाकडे वळला. तोरणा असा एकच किल्ला ठरला जो मोगलांनी युद्ध करून घेतला(ग.प्र.शक - माला लावून घेतला). राजगडानंतर एका महिन्याच्या आत १० मार्च १७०४ ला तोरणा मोगलांच्या हातात पडला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४८). ह्या खेरीज मोगलांनी नंदगिरी, चंदन-वंदन ,सामानगड , वर्धनगड , कलानिधीगड, वसंतगड घेतल्याचा ही उल्लेख आहे.
मराठा सैन्याच्या हालचाली व आघाड्या
ह्या गडांना वेढा पडलेला असताना ह्या परिस्थितीचा महाराणी ताराबाईंनी भरभरून फायदा उठवला. त्यांनी मोगलांचा प्रतिकाराची २ सूत्री योजना आखली होती असे स्पष्ट दिसते. मराठयांच्या छोट्या छोट्या तुकड्या ज्या किल्ल्याला वेढा पडला असेल त्या ठिकाणी मोगल फौजेवर बाहेरून हल्ला करून त्यांना वारंवार तडाखे देत होत्या. किल्ले घेण्यात येत असलेल्या अपयशाने हैराण झालेल्या फौजेवर असे जबरदस्त आघात होत होते. दुसरीकडे महाराणींनी आपले सरदार मोठ्या फौजेच्या तुकड्यांसोबत दक्खनच्या बाहेर मोगली सुभ्यांवर पाठवून अनेक नव्या आघाड्या उघडल्या !!! विशाळगडाच्या वेढ्यासमयी महाराणींनी आपल्या फौजा औरंगाबाद आणि फोंड्याच्या दिशेने पाठवल्या. औरंगाबादच्या संरक्षणार्थ आलेल्या जुल्फिकारखानाला पळवून लावून मराठा फौज पुढे वऱ्हाड प्रांताकडे वळाली. त्याचवेळी फोंड्याच्या दिशेने बहिर्जी घोरपडेंच्या नेतृत्वाखाली एक फौज भीमगड वगैरे भागात स्वारीसाठी उतरली(ताराबाईकालीन कागदपत्रे - १ १२१). त्याच सुमारास अजून एक मोठी फौजेची तुकडी महाराणी ताराबाईंनी कृष्णाजी सावंत ह्यांच्या बरोबर थेट माळव्या वर धाडली. नर्मदेच्या पलीकडे धामधूम माजवून मोठी खंडणी घेऊन कृष्णाजी सावंत परत महाराष्ट्रात परतले(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४५). ह्याच कृष्णाजी सावंतांनी १६९९-१७०० ला राजाराम महाराजांच्या वेळी नर्मदा पार करून माळवा स्वारी केली होती(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४२) - नर्मदा पार करणारे ते पहिले मराठा सरदार होय. अशीच एक मोठी मराठा फौज त्याच वेळी बुऱ्हाणपूर वर चालून गेली. मोगलांचे हे दक्षिणेतील प्रमुख शहर बेचिराख करून सुभेदाराला कैद करण्यात आलं. मोठी खंडणी घेऊन त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर मराठा फौजेचा मोर्चा वळाला भागानगर उर्फ गोवळकॊंड्याकडे. शत्रुसैन्याची ताकत व त्यांचा पराक्रम बघूनच गोवळकोंड्याचा मोगल सुभेदाराचे अवसान गळाले. मराठा सैन्याची खंडणीची धमकी लगेच मान्य करून शहराच्या संरक्षणासाठी त्याने मराठ्यांना खूप मोठी खंडणी देऊ केली(असे होते मोगल(मनूची) : पृ ३८३ ).
कोंढाण्याच्या वेढ्याच्या वेळी मोठी मोगली फौज वेढ्यात अडकून पडली आहे हे बघून महाराणींनी आपले सरनोबत धनाजी जाधव ह्यांना उत्तर कर्नाटकात पाठवले. विजापुरी कर्नाटकाचा मोगली सुभेदार चिंकीलीच खान. तो जीव वाचवत पळून मुदगलच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. कर्नाटकातल्या सुभ्यात धनाजी जाधवांचे तांडव बघून औरंगजेबाने जुल्फिकार खानाला त्यांच्या वर पाठवले. पण खान विजापूरच्या आसपास पोहोचेपर्यंत मराठ्यांनी आपली दिशा बदलूनबदलून गुलबर्ग्याकडे कूच केली. जुल्फिकारखानाच्या हाती त्यामुळे काहीच लागले नाही.(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४५) कर्नाटकात असा धुमाकूळ घातल्यानंतर कोंढाण्याचा वेढा चालू असतानाच एक मोठी फौजेची तुकडी घेऊन सरदार नेमाजी शिंदे आणि केसो त्रिमल माळव्यात घुसले(ग.प्र.शक),असे होते मोगल(मनूची) : पृ ३८६). मराठा फौजेचा त्रिशूळ माळव्याच्या मोगली सुभ्याच्या छाताडात घुसला आणि उज्जैन, सिरोंज आणि बुऱ्हाणपूर वर हल्ला झाला. तिन्ही ठिकाणी लुटालूट करून भल्या मोठ्या खंडण्या वसूल करण्यात आल्या. माळवा प्रांतात मराठा फौजेनी केलेल्या हल्ल्यांची खबर औरंगजेबाला कोंढाण्याच्या वेढ्यात मिळत होती. जुल्फिकारखान, शहजादा बेदरबाखत वगैरेंना लगेच त्यांनी तिकडे रवाना केले. पण असे मोगलांच्या हातात सापडतील ते स्वराज्याचे मावळे कसले - ते तर आपलं काम उरकून कधीच माळव्यातून पसार झाले होते. जुल्फिकारखानाची तर फारच दयनीय अवस्था झाली होती. औरंगाबादला त्याला बातमी मिळाली कि मराठा फौज नंदुरबार मध्ये हल्ला करते आहे. तो तिकडे वळाला तर मराठा सैन्य नंदुरबारहून नाशिक-बागलाण कडे निघून गेले. त्याने तिकडे रोख वळवला तर पुढची बातमी अशी आली कि मराठा फौज खाली खाली सरकून थेट औरंगजेबाच्या छावणीच्या दिशेने निघाली आहे !!! जुल्फिकारने शिरवळ जवळ कसेतरी करून मराठ्यांचा बादशाही छावणीवरच्या हल्ल्याचा मनसुबा परतवला(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४६).असे करून तो नुसताच चकवा लागल्या सारखा फिरत राहिला - मराठे काही त्याला सापडेना !!!! १७०३ च्या नोव्हेंबर-डिसेंबर च्या आसपास नेमाजी आणि केसोपंत ह्यांनी सर्जाखानला पराभूत करून त्याच्याकडून ३ लाख खंडणी उकळून सोडून दिले(ग.प्र.शक)
१७०४ च्या सुरवातीला (मोगलांच्या राजगड मोहिमेच्या वेळी) ताराबाईंनी अशीच एक मोठी धूम उडवली. पन्नास हजार फौजेसह नर्मदा ओलांडून नेमाजी शिंदे, परसोजी भोसले आणि केसो त्रिमल (ग.प्र.शक) ह्यांनी माळव्याच्या मोगली सुभेदार रुस्तमखानला कैद केली. माळव्यात पुर्ण हैदोस घालून सिरोंज ला वेढा पडला. नेहमीप्रमाणे मोठी लूट मिळाली आणि चौथ आकारण्यात आला. कालबाग पर्यंत पोचलेल्या मराठा फौजेला रोखण्यासाठी गाझीउद्दीन फिरोजजंगला धाडण्यात आले (ग.प्र.शक) पण त्याच्या हातात कोणीच सापडलं नाही(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४७). फेब्रुवारी १७०४ ला २० हजाराची एक मराठा फौज हैदराबाद आणि मछलीपटणम पर्यंत धडकली. ह्या पूर्ण प्रदेशातुन चौथ वसूल करण्यात आला. जून १७०४ मध्ये मराठ्यांनी हैद्राबादच्या आसपास पुन्हा हल्ला चढवला. एवढच नाही तर गोवळकोंड्याच्या घाबरलेल्या मोगल सूभेदाराकडून प्रचंड मोठी खंडणी वसूल करण्यात आली. (Storia Do Mogor - ३ - पृ ५०६)
हैदराबाद आणि आसपास असा हल्ला चालू असताना त्याच सुमारास ६० हजाराची एक भव्य फौज कर्नाटकात उतरली. भीमसेनच्या वर्णनानुसार धनाजी जाधव , हणमंतराव निंबाळकर आणि बहिर्जी घोरपडे हे ह्या फौजेचे सेनापती होते. मराठ्यांच्या धडाक्या समोर मोगली ठाणी पटापट शरण येऊ लागली. इथून ह्या फौजेचे ३ भाग झाले - खंडणी उकळून पुढे कूच करत एक भाग त्रिचनापल्ली पर्यंत पोचला होता. दुसरी तुकडीने गोवळकोंड्याच्या दिशेने कूच करून तिथून खंडणी आणि चौथ वसूल केला. ह्याच वेळेला तिसरी तुकडीने बाकीच्या कर्नाटक सुभ्यात हल्ले चढवले , किल्ले हस्तगत केले आणि चौथ वसूल करून एकच धमाल उडवून दिली(Storia Do Mogor - ३ - पृ ५०४). कर्नाटकचा मोगल सुभेदार दाऊदखान घाबरून अरकटच्या किल्ल्यात आणि नंतर वेल्लोरच्या किल्ल्यात लपून बसला होता. पण मराठा फौजेनी त्याला शोधून काढले आणि त्याच्या कडून वर्षातून ५ लाखाची जबर खंडणी वसूल करण्यात आली.(Storia Do Mogor - ३ - पृ ५०६).
महाराणी ताराबाईंच्या सुरुवातीच्या काळातली युद्धनीतीची ठळक वैशिष्ट्ये
Comments