वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना
- आदित्य गोखले
- Dec 16, 2022
- 6 min read
Updated: Apr 3
२५ मार्च १६८९ ला रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज अत्यंत शिताफीने मोगलांना चकवून वेढ्यातून निसटले. प्रतापगड, वासोटा, पन्हाळा आणि तिथून कर्नाटक मधून मोगलरूपी जिवाच्या धोक्याशी झुंज देत नोव्हेंबर १६८९ ला राजे जिंजीला पोचले. जिंजीला त्यांनी स्वराज्याची प्रशासकीय आणि राजनैतिक राजधानी बनवले. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी बलिदानानंतर औरंगजेबाने लगेच रायगडाला वेढा घालायचे फर्मान काढले. शिवाजी महाराजांच्या सगळ्या कुटुंबाला अटक करून हे स्वराज्य कायमचे मिटवून टाकावे हा त्याचा हेतू. त्याच्या ह्या योजनेला राजाराम महाराज निसटून जिंजीला गेल्यामुळे एक सणसणीत चपराक मिळाली. रायगडाला ज्याने वेढा घातला त्याच झुल्फिकार खानाला औरंगजेबाने आता जिंजीला जाऊन राजाराम महाराजांना अटक करायची कामगिरी सोपवली. हा जुल्फिकार खान म्हणजे मोगली वजीर असद खानाचा मुलगा आणि औरंगजेबाच्या खास मर्जीतला सरदार.
१६९० - जिंजीला प्रथमच वेढा
जिंजीचा किल्ला हा सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे - चेन्नई पासून साधारण १५०-१६० कि.मी आणि वेल्लोर पासून साधारण १०० कि.मी. हा किल्ला ३ टेकड्यांवर मिळून वसला आहे - कृष्णगिरी, राजागिरी/अनंदगिरी आणि चांद्रयानदुर्ग. किल्ल्याचा एकूण पसारा खूप मोठा आणि तटबंदी मजबूत. खफी खान या किल्ल्याचं वर्णन करताना म्हणतो की जिंजीचा किल्ला हा बाजूबाजूला असलेल्या बऱ्याच टेकड्यांवर मिळून बसवला आहे. प्रत्येक टेकडीवर एक गढी आहे.यापैकी दोन टेकड्या खूपच उंच आहेत. किल्ल्यात दारुगोळा, रसद आणि इतर आवश्यक गोष्टी या ठासून भरल्या होत्या.
अशा हया जिंजीच्या किल्ल्याला पहिल्यांदी २९ ऑगस्ट १६९० ला झुल्फीकारखानानी वेढा घातला (जेधे शकावली ). ह्या वेढ्याची पूर्वसूचना राजाराम महाराजांना असावी कारण जसा वेढा पडायला लागला तसे महाराज स्वराज्याच्या कर्नाटक सुभ्यात निघून गेले. ह्याच वेळी जिंजीच्या मोगल छावणीतून काही मराठा सरदार(माणकोजी पांढरे, नागोजी माने आणि नेमाजी शिंदे) फुटून राजाराम राजेंना सामील झाले. ह्या घटनेमुळे वेढा पूर्ण करता आला नाही असे दिसते. राजाराम राजे फेब्रुवारी १६९१ ला जिंजीला परतल्याची नोंद आहे(जेधे शकावली ). १६९० ला चालू झालेला हा महाराजांना अटकेचा प्रयत्न - वेढा घालणे, वेढा उठवणे - हा थेट १६९८ पर्यंत चालू राहिला. ह्या काळात मोगल फौजेचे बरेच हाल झाले हे पुढच्या हकीकती वरून कळेल
१६९२-९३ : संताजी-धनाजी आणि कामबक्ष !!!!
१६९० च्या अखेरीपासून पुढचे ८ वर्ष जुल्फिकार खान जिंजीच्या भोवतालच्या प्रदेशातच ठाण मांडून होता. १६९१-९२ मध्ये मराठा फौजेनी मोगल सैन्यावर असंख्य हल्ले केले होते. ह्यात कर्नाटक प्रांतात मोगलांची दाणादाण उडवल्यानी जुल्फिकार खानाला बादशाही छावणीतून मिळणाऱ्या मदती/रसदी वर परिणाम व्हायला लागला. ह्याचा आणि वेढ्यावर आतून - बाहेरून सारख्या होणाऱ्या हल्ल्यांचा परिणाम म्हणून झुल्फिकार खानाने जिंजीहुन १२ कोस मागे फिरून तळ ठोकला(मस्सीर-आलमगिरी - औरंगजेब राजवट ३६वे वर्ष ). त्याचे सैन्य एक प्रलंबित वेढा देण्याच्या स्थितीत नव्हते. ह्याची दाखल घेत औरंगजेबाने तातडीने आधी वजीर असदखान आणि २७-मे-१६९१ ला शाहजादा कामबक्षला झुल्फिकार खानाच्या मदती साठी धाडले.
कामबक्ष आणि असदखान जिंजीला १६-डिसेंबर-१६९१ ला पोचले(मस्सीर-आलमगिरी ) आणि पुन्हा एकदा वेढा चालू झाला. इथून मात्र मोगल छावणीत चालू झालं एक कमालीचे नाट्य !!! खफी खानाच्या वर्णनानुसार वेढ्याची आणि एकूण त्या मुलुखाची जबाबदारी कोणाकडे असावी याच्यावरून एक बाजूला कामबक्ष आणि दुसऱ्या बाजूला असद-झुल्फिकर या बाप-बेट्यामध्ये मतभेद व्हायला लागले (मुंतुखाब-उल-लुबाब - औरंगजेब राजवट ३८वे वर्ष ). दुसऱ्या एका संदर्भानुसार कामबक्ष आणि असदखान यांची कडप्पाला भेट झाली. त्यानंतर कडप्पा ते जिंजी हा प्रवास कामबक्षने अत्यंत हळू वेगाने, मौजमजा आणि शिकार करत आणि असदखानचा एकही सल्ला न ऐकता केला. त्यामुळे या दोघांच्यात तसेही मतभेद आधीपासूनच चालू झाले होते. त्यातच कामबक्षने थेट किल्ल्यातल्या शिबंदीशी संवाद चालू केल्याच्या बातम्या आल्या(पसरवल्या गेल्या ?). अजून एक वावडी उठवण्यात आली की कामबक्ष ने एका रात्री कधीतरी गुप्तपणे किल्ल्यात प्रवेश करण्याचा मनसुबा रचला आहे. हे सगळे कळाल्यावर जुल्फिकार आणि असदखान यांनी औरंगजेबाला याच्याबद्दल पत्र पाठवून त्याच्याच परवानगीने कामबक्षच्या छावणीसमोर पहाऱ्याच्या चौका बसवल्या(मस्सीर-आलमगिरी ). वेढ्यात प्रत्यक्ष हजर असलेला भीमसेन सक्सेना हा अजून तपशील देतो - त्याच्या मते एक बाजूला मोगल छावणीत असं संशयाचे वातावरण असताना मोगली सैन्यावर वारंवर किल्ल्यातून अचानक छापे घातले जात होते (तारिक-ए-दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष ३५ ).
त्यातच भर म्हणून डिसेंबर १६९२ ला शंकराजी नारायण यांनी धनाजींना आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी संताजींना 15000 फौज बरोबर देऊन जिंजीचा वेढा मारण्यास पाठवले. धनाजींनी वेड्याचा पश्चिमेचा बाजूच्या चौक्या उद्ध्वस्त करून मोगली सरदार इस्माईल खान मका याला अटक केली.ह्या छाप्यात "५०० घोडे आणि २ हत्ती पाडाव केले". दुसऱ्या बाजूने संताजी यांनी जिंजीच्या वाटेवर असताना मोगलांचा कांचीपुरमचा फौजदार आली मर्दा खान याला गाठून जबरदस्त तडाखा दिला. अलिमर्दा खान व बरीचशी रसद पकडली गेली - शिवाय "१५०० घोडे आणि ६ हत्ती पाडाव केले"(जेधे शक ). हे दोन विजेचे लोळ दोन वेगळ्या दिशांनी जिंजीच्या मोगली सैन्यावर चालून आले होते. या वेळची एक अजब हकीकत भीमसेन सांगतो - सततच्या लढाया आणि मराठ्यांनी वेढ्याला केलेल्या हल्ल्यांमुळे औरंगजेबाची छावणी आणि वेढ्यातले सैन्य ह्यांच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता. यावेळी बहुदा किल्ल्यातल्या शिबंदीने अशी हूल उठवली की औरंगजेब हा मरण पावला. ब्रिटिशांच्या पत्रव्यव्हारात ह्या बातमीची पुष्टी होते (फोर्ट सेंट जॉर्ज डायरी १६९३ पान २४ ). ही बातमी ऐकताच कामबक्षच्या सल्लागारांनी त्याला सुचवले की गनीम पूर्ण डोईजड होण्याआधी त्याने जुल्फिकार-असद यांना कैद करावे आणि पूर्ण नियंत्रण आणि सत्ता स्वतःच्या हातात घ्यावी. या सल्ल्यानुसार कामबक्षाने बाप-बेट्याला अटक करायची तयारी चालू केली. म्हणजे मराठ्यांनी उठवलेल्या खोट्या बातमीचा योग्य परिणाम झाला होता. ह्या हालचाली असद खानला कळतच त्याने व जुल्फिकारखानने थेट शहजाद्याच्या छावणीवर धडक देऊन कामबक्षलाच नजरकैद केले. त्याचवेळी कांचीपुरम वरून पुढे येत संताजी जिंजीच्या वेढ्यावर तुटून पडले. एक तर आपापसातल्या मतभेदात सापडलेला गनीम आणि त्यांच्यावर आलेलं संताजी नावाचं महासंकट !!! (तारिक-ए-दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष ३५ ). शत्रुची भयानक कत्तल आणि त्यांची रसद व खजिना याची भयंकर लुटालूट संताजी-धनाजी यांनी केली. रसद इतकी अपुरी होती जुल्फिकारखान बारा कोस मागे असलेल्या वंदिवाशच्या मोगली ठाण्यातून रसद आणायला गेला. मोगली रसद येते आहे असं म्हणल्यावर काय होणार - वाटेत पुन्हा त्यांना संताजी भेटले आणि त्या रसदेचा काय झालं असेल त्याची आपण कल्पना केलेली बरी.(फोर्ट सेंट जॉर्ज डायरी १६९३ पान २३ ). जिंजीला वेढलेल्या मोगली फौजेला मराठा फौजेने संताजी-धनाजी यांच्या मराठा फौजेने गराडा घातला आणि त्यांची रसद पूर्णपणे बंद झाली.
अशा परिस्थितीत झुलफिकारखानाने राजाराम महाराजांची तहाची बोलणी चालू केली. भीमसेनच्या मते बरेच मराठा सरदारांचा विरोध असतानाही राजाराम महाराजांनी तह स्वीकार केला. (तारिक-ए-दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष ३५ ). ह्या अनुषंगाने पॉंडिचेरीचा समकालीन फ्रेंच गव्हर्नर मार्टिन ह्याच्या नोंदीनुसार राजाराम महाराज आणि झुल्फिकार खान ह्यांच्यात एक छुपा समजौता होता. म्हातारा औरंगजेबानंतर दक्षिणेतच आपले साम्राज्य थाटण्याचा असद-झुल्फिकार ह्यांचा मनसुबा होता. त्या कारणास्तव राजाराम महाराजांशी सबुरीने वागून नंतर स्वतः कुतुबशाही प्रांत हस्तगत करण्याचा त्याचा मनसुबा होता. राजाराम महाराजांना ह्या व्यवस्थेत विजापुरी मुलुख मिळाला असता(सरकार HOS - २२३). अर्थात अन्यत्र कुठल्या साधनात अशा व्यवस्थेविषयी कुठेही सबळ अशी नोंद नाहीये. ह्या तहांतर्गत झुल्फीकारने मराठ्यांना मोगली सैन्याच्या सुखरूप परतीसाठी १ लाखाचे सोने तसेच ६०००० चे दागिने इत्यादी खंडणी पाठवून दिली - झुल्फीकारला बदल्यात १५००० चा ऐवज आणि सामान वाहून न्यायला १ हत्ती, २ घोडे बरेच उंट आणि २००० बैल देण्यात आले (सरकार HOS - १६ पृ २२२). तह मान्य झाल्यानंतर जुल्फिकारखान मोगली सैन्याला घेऊन अलीकडे आधी सांगितलेल्या वंदिवाशच्या(सध्याचे वंदवासी, तमिळनाडू) मोगली ठाण्याला निघून गेले (२२ जानेवारी १६९३- जेधे शकावली ). या पद्धतीने अजून एकदा जिंजी आणि राजाराम महाराज यांना वेढण्याचा मोगलांचा प्रयत्न परत पूर्णपणे फसला.
अखेरचा प्रयत्न
Comments