top of page

शिवाजी महाराजांच्या काळातली सैन्यरचना

  • Writer: आदित्य गोखले
    आदित्य गोखले
  • Feb 18, 2022
  • 4 min read

Updated: Dec 15, 2022

लढाईचे डावपेच आखणे, व्यूहरचना करणे तसेच मूठभर सैन्यासह गनिमी कावा करून शत्रूच्या मोठ्या फौजेला तडाखा देण्यात शिवाजी महाराजांच्या तोडीचा सैन्याधिपती इतिहासात शोधून सापडणे कठीण. राजेंच्या बालपणी त्यांचे खेळ काही औरच - सामान्य बालगोपाळांच्या खेळांमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. त्यांना आवड होती ती युद्ध, सैन्य, किल्ले, मोहीमा, युद्धाचे डावपेच अशा खेळांची. त्यांच्या खेळातले सवंगडी तानाजी मालुसरे, गोदाजी जगताप, येसाजी कंक व इतर हे पुढे जाऊन स्वराज्याचे मातब्बर सरदार आणि शौर्याचे अतुलनीय नमुने बनले.

सुरवातीला स्वराज्याच्या फौजेची संख्या अगदीच नगण्य होती - साधारण ५ ते ७ हजाराच्या घरात. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत स्वराज्य सेना सुमारे २ लाखाची एक विशाल, सशक्त फौज म्हणून नावारूपाला आली होती. राजकारण व शासनाच्या इतर पैलूंप्रमाणे फौजेची संरचना व संघटना महाराजांनी अत्यंत काटेकोरपणे केली होती. शौर्य व शिस्त हे ह्या फौजेचे २ पायाभूत गुण होते असे म्हणायला हरकत नाही.

फौजेचे ३ प्रमुख विभाग होते :

१. पायदळ
२. घोडदळ
३. आरमार


पायदळाची रचना


१. प्रत्येक १० मावळ्यांच्या समूहाच्या अग्रभागी १ नाईक - म्हणजे ९ पाईक व १ नाईक मिळून १० मावळे
२. ५ नाईकांच्या वर एक हवालदार/पंचनाईक
३. २ हवाल्यांच्या वरती एक जुमलेदार - वेतन १०० होन
४. १० जुमलेदारांच्या वर एक एक-हजारी(१००० चा सरदार) - वेतन ५०० होन
५. अशा ५ एक-हजारींवर एक पंचहजारी

पंचहजारीच्या वर मात्र कुठलाही हुद्दा नव्हता - सर्व पंचहजारी हे थेट सरनोबतांच्या अखत्यारीत होते.

घोडदळाची रचना


१. २५ घोडेस्वार मावळ्यांवर १ हवालदार
२. ५ हवाल्यांच्या वर १ जुमलेदार (५ हवाले = १२५ असले तरी जुमलेदार म्हणजे १०० चा नेता असं गणित केलं जाई) .- वेतन ५०० होन व पालखीचा मान
३. १० जुमल्यांवर असायचा एक हजारी - वेतन १००० होन
४. ५ हजारींवर असायचा १ पंचहजारी - वेतन २००० होन

सगळे पंचहजारी थेट सरनोबांच्या अखत्यारीत होते.

सर्व हजारी आणि पंचहजारी ह्यांच्या बरोबर ३ कारकून असत - मुजुमदार(आर्थिक बाबी), कारभारी (पत्रव्यवहार आणि दैनंदिन कारभार) आणि जामनीस(खाते लिहिणारा).

प्रत्येक २५ घोड्यांच्या तुकडीमागे २ लोकं घोड्यांच्या देखभालीसाठी असत - पखालजी(घोड्यांसाठी पाण्याची व्यवस्था बघणे) आणि नाळबंद(घोड्याचे खूर आणि आरोग्याच्या देखभालीसाठी).

घोडदळात मुख्यत्वे २ प्रकारचे सैनिक होते :

१. बारगीर : ह्या सैनिकांना स्वराज्याच्या पागेतून घोडे पुरवले जात. बरेच वेळा त्यांची शस्त्र सुद्धा स्वराज्याच्या शास्त्रागारातून बहाल करण्यात येत असत
२. शिलेदार : ह्या सैनिकांकडे स्वतःचे घोडे व बरेच वेळा शस्त्रही असत - स्वराज्याच्या सैन्यात लढण्यासाठी ही मंडळी करारबद्ध असत


आरमाराची रचना


शिवाजी महाराज कदाचित असे पहिले राजे असतील ज्यांनी समुद्रावर नजर ठेवायचे खरे महत्व ओळखले होते. स्वराज्याच्या पश्चिम सीमेवर अथांग अरबी समुद्र पसरला होता. ज्यांच्याकडे नौदलाची ताकत होती - जंजिरेकर सिद्दी, पोर्तुगीज, टोपीकर इंग्रज - ते समुद्राचे सिकंदर होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांशी करार असल्यानी मोगलांच्या व्यापारी आणि युद्ध नौका बिनधोकपणे त्यांच्या जलहद्दीत ये-जा करत असत. ह्या कारणास्तव स्वराज्याच्या पश्चिम सीमेला कायमस्वरूपी धोका होता. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी अगदी तळकोकण पासून कल्याण-भिवंडी पर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आणला तेव्हा २ गोष्टी तातडीने सुरु केल्या - एक बलाढ्य आरमार उभारणे आणि जलदुर्ग बांधणे.

स्वराज्याच्या आरमाराची नक्की संख्या किती हा आकडा कुठेही मिळत नाही - पण वेगवेगळ्या संदर्भांवरून असे दिसते कि किमान ४०० नौका असाव्यात. नौदलाच्या अग्रभागी होते २ मातब्बर सरदार - दर्या सागरआणि मायनाक भंडारी.आरमारात वेगवेगळ्या प्रकारच्या नौका समाविष्ट होत्या - गुराबा, तरांडा, गलबत, शिबाड इत्यादी. आरमाराच्या मदतीसाठी आणि समुद्री गनिमांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग असे कित्येक जलदुर्ग समुद्रात उभे राहिले.

त्या काळी समुद्री युद्धाचे महत्व जाणणे व त्याची तयारी करणे हे उत्तम उदहारण आहे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपणाचे !!!


सैन्याच्या हालचाली आणि इतर काटेकोर नियम


पायदळाचा उपयोग गनिमी काव्यात खासा होई - मूठभर सैनिकांनी छापा मारून शत्रूला मोठी हानी पोचवण्यात पायदळी सैन्य तरबेज होतं. तिकडे घोडदळ विजेच्या चपळाईनी शत्रू वर बरसत असे - बरेच वेळा रात्रीच्या अंधारात मोठमोठ्या रपेटी मारून घोडदळाच्या तुकड्या शत्रूच्या ध्यानीमनी नसताना हल्ला चढवत.

फौजेनी कधी आणि कशी कूच करावी आणि काय करावे ह्याबद्दल काटेकोर नियम होते. पावसाळ्याचे ४ महिने फौज छावणीत परतत असे - सह्याद्रीच्या डोंगरदर्या मधल्या रौद्र पावसात कुठलीही मोहीम आखण्यात येत नसे. छावणी सोडून नवी मोहीम हाती घेतली जाई ती दसऱ्याच्या सुमारास ऑक्टोबर महिन्यात. त्यानंतरचे ८ महिने मात्र फौजा कायम बाहेर असत - कधी युद्ध करत तर कधी चौथ/महसूल गोळा करत तर कधी रयतेचं शत्रू पासून संरक्षण करत.

मोहिमेच्या वेळी फौजेत आणि छावणीत कुठल्याही बायकांना ठेवायला पाबंदी होती - ना स्वतःच्या बायका-मुली ना नर्तिका\तमाशा. कुठल्याही मोहिमेत कुठल्याही बाई माणसावर हात न टाकणे, गोधनाला कुठल्याही प्रकारची इजा न पोचवणे, धार्मिक महत्वाच्या कुठल्याही व्यक्तीला त्रास ने देणे ह्या बद्दल अतिशय काटेकोर नियम होते. ह्या नियमांशी कुठल्याही प्रकारची फारकत घेणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण.

मोहीमा व लढाईच्या वेळी लूट म्हणुन मिळवलेले सोने-चांदी, हिरे, रत्न, जडजवाहीर, कपडालत्ता इत्यादी मालमत्ता सरकारी तिजोरीत जमा करावी लागे. जर कोणी कुठल्याही प्रकारची मौल्यवान वस्तू लपवून ठेवायचा प्रयन्त केला तर त्या व्यक्तीस कठोर शिक्षा सुनावण्यात येत असत. सगळी लूट ही सदर अथवा दुसऱ्या सरकारी कचेरीमध्ये आणून, त्याची मोजदाद करून ती सरकारी खजिन्यात जमा केली जात असे. ८ महिन्यात ज्याने कुठल्याही प्रकारचा नियमभंग केला असेल त्याच्या वर खटला चालवून योग्य तो निवाडा केला जाई.

शिवाजी महाराजांच्या सैन्याचे संख्याबळ लक्षात घेण्यासारखे आहे. सुरवातीच्या ५०००-७००० च्या नगण्य संख्येवरून अफझलखान वध व त्या नंतरच्या बिजापुरी मुलखातल्या मोहिमेच्या वेळेपर्यंत पर्यंत १५००० घोडदळ(७००० बारगीर व ८००० शिलेदार) आणि १२००० पायदळ अशी बळकट फौज तयार झाली. ही संख्या वाढत वाढत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेपर्यंत १०५०० घोडदळ(४५००० बारगीर व ६०००० शिलेदार) आणि १००००० पायदळ असा अफाट सेनासमुद्र तयार झाला !!

स्वराज्य त्या प्रत्येक मावळ्याचे नेहमीच ऋणी राहील ज्याने स्वराज्याच्या कामात आपल्या कुटुंब-कबिल्याची पर्वा ना करता स्वतःचे तन आणि मन झोकून दिले. त्यांच्या ह्या विलक्षण बलिदानामुळे हे अतुलनीय स्वराज्य उभे राहंण्यास हातभार लागला.


संदर्भ :


. सभासद बखर

Comments


कुठलाही लेख किंवा अन्य माहिती कॉपी करू नये - सर्व हक्क सुरक्षित

नवीन लेख आणि अन्य माहिती च्या नोटिफिकेशन साठी subscribe करू शकता  

Subscribe केल्याबद्दल धन्यवाद !!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
Site Logos.png

महत्वाची सूचना - कुठल्याही लेखातल्या माहितीचे परवानगीशिवाय कृपया अनुकरण करू नये - तसेच कुठल्याही लेखातला मजकूर किंवा कुठलीही इमेज कॉपी करू नये - #History Blog #सह्याद्रीचे स्वराज्य

bottom of page