साल्हेरचा निर्णायक संग्राम
- आदित्य गोखले
- Dec 16, 2022
- 5 min read
Updated: Apr 17, 2023
१६७० मध्ये महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी करून स्वराज्यकामासाठी परत एकदा मोठी दौलत आणली. केवळ सुरतच नाही तर त्याच्या नंतर कारंजा आणि औरंगाबादच्या मोगली प्रदेशावर स्वारी करून तिथून ही बक्कळ ऐवज वसूल करण्यात आला. त्याच बरोबर पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना द्यावे लागले ते मराठ्यांनी एका धडक मोहिमेत १६७१-७२ मध्ये पुन्हा एकदा स्वराज्यात आणले. महाराजांनी १६७० मध्ये तह संपुष्टात आणून मोगलांना असा दुहेरी दणका दिला.
साल्हेरच्या लढाईची पार्श्वभूमी
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोंढाण्याच्या लढाई पासून सतत मराठा-मोगल धुमश्चक्री चालू होती. त्यात महाराजांनी सुरतेवर दुसरी स्वारी केल्यापासून (ऑक्टोबर १६७०) प्रामुख्याने बागलाण प्रदेशात तर खूपच तुंबळ असे रण माजले होते. त्याला कारण ही तसेच - बागलाण भागावर महाराजांनी ताबा मिळवला म्हणजे त्यांची सुरत आणि गुजरातच्या मोगली सुभ्यांवर आक्रमणाची वाट मोकळी झाली. त्यामुळे हा प्रदेश मोगलांच्या दृष्टीने ही खूप महत्वाचा. महाराज सुरतेहून परत येत असताना १७ ऑक्टोबर १६७० ला दाऊदखानाने दिंडोरी जवळ त्यांना गाठले तेव्हा महाराजांनी सुद्धा पाठीवर आलेली मोगली फौज झोडपून काढली. तिथून पुढे महाराज कारंजाला गेले पण ह्या वाटचालीत त्यांनी अहिवंत, रवळ्या-जावळ्या आणि मार्कंड्या किल्ले काबीज केले(जेधे शक) - ही होती बागलाण प्रदेशातल्या मराठा-मोगल संघर्षाची पहिली ठिणगी !!
ह्याच दरम्यान महाराजांनी मोरोपंत पेशवे यांना फौज देऊन कोकण बागलाण मोहिमेवर रवाना केले. बागलाण प्रदेशात मोगलांच्या अधिपत्यात असलेले किल्ले घेण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्याप्रमाणे मोरोपंत यांनी त्रिंबक गड आणि बागलाणातला मुख्य साल्हेरचा किल्ला ह्यासह अनेक किल्ले व प्रदेश हस्तगत केला(चिटणीस बखर - इथे २७ किल्ले घेतल्याची नोंद तर सभासद ४० किल्ले म्हणतो). त्यामुळे ह्या सुमारास स्वराज्याची एक मोठी फौज मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली बागलाण प्रदेशातच उपस्थित होती.
ह्या घटनांमुळे त्या भागाचा मोगली सुभेदार महाबतखान हा जागा झाला किंवा त्याला दिल्लीहून सख्त फर्मान आले असावे. त्यानी जाऊन अहिवंत , मार्कंड्या,जावळ्या आणि आचलागिरी हे किल्ले परत ताब्यात घेतले(जेधे शक). यानंतर मात्र त्याच्याकडून फारशी काही कामगिरी झाली नाही आणि त्यामुळे महाबतखानाच्या जागी सप्टेंबर १६७१ मध्ये बहादूरखानाची सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी गुजरातचा सुभेदार असलेला बहादूरखान हा दिलेरखानाच्या सोबतीने आपल्या नवनियुक्त सुभ्यावर रवाना झाला. (तारीख-या-दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष १४)
.
ह्याच्या थोडेसे विपरीत अशा सभासदाच्या वर्णनानुसार बागलाण आणि खानदेश प्रदेशातली ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी औरंगजेबाने दोन फौजेच्या तुकड्या रवाना केल्या. पहिली तुकडी इख्लासखान आणि बेहलोलखान यांच्यासह २० हजार स्वार देऊन खासा साल्हेर किल्ल्यावर मोहिमेसाठी रवाना झाली- दुसरी तुकडी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली अहिवंत, रवळ्या-जावळ्या असे इतर किल्ले व प्रदेश परत जिंकून घेण्यासाठी पाठवण्यात आली. (सभासद बखर)
रामाजी पांगेरा आणि कण्हेरगडचा झगडा
पैकी दिलेरखान याने चालून येऊन रवळ्या-जावळ्या किल्ला घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला असे दिसते. त्यातच मोरोपंत पेशवे यांनी त्याच्या फौजेवर छापा घालून त्याला तिथून पळवून लावले. तिथे अशा रीतीने मार खाल्यावर दिलेरखान आपले फौजेनिशी कण्हेरगड किल्ल्याच्या खाली पोचला. कण्हेरगड वर शूर सरदार रामजी पांगेरा हे हजार लोकांशी होते. हजारच लोक असल्याने किल्ला सहज हस्तगत होईल असे दिलेरखानाला वाटले परंतु त्यांनी रामजी पांगेरा यांना अजून ओळखलं नव्हते. केवळ सातशे लोकांनिशी रामाजींनी थेट दिलेरखानावर हल्ला चढवला. सभासद म्हणतो तसे एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तसे मावळे भांडले. ह्या युद्धात दिलेरखानाचे हजार बाराशे पठाण कामास आले दिलेरखानाला कण्हेरगडाहून काढता पाय घ्यावा लागला.(सभासद बखर)
चिटणीस बखरीत या काळाचे थोडे गुंतागुंतीचे वर्णन आहे - तिथल्या हकीकतीनुसार दिलेरखान व इख्लासखान यांनी प्रथम साल्हेरवर चालून जाऊन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना साल्हेरकडे रवाना केल्यामुळे व त्यांनी जाऊन दिलेरखानावर छापा घातल्यामुळे या दोन खानांना साल्हेरहून काढता पाय घ्यावा लागला. तेथून निघून ते दोघे पोचले ते कण्हेरगड किल्ल्याच्या पायथ्याशी !! वर म्हणल्याप्रमाणे इथे थोडी शिबंदी असूनही एक जबरदस्त युद्ध होऊन दिलेरखानाला एक मोठा दणका बसला. (इथे मात्र रामाजी पांगेरा यांच्या ऐवजी सरदाराचे नाव रूमाजी नळगे असे दिले आहे व ते या लढाईत शहीद झाले असे वर्णन मिळते)(चिटणीस बखर)
साल्हेरची लढाई - बागलाणात मराठा वर्चस्व प्रस्थापित
कण्हेरगडला सपाटून मार खाल्यावर मोघलांचा मोर्चा हा परत साल्हेर कडे वळाला इख्लासखान आणि बेहलोलखान यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दहा ते पंधरा हजार फौज साल्हेरच्या वेढ्यात ठेवून बहादूरखान आणि दिलेरखानाने पुढे कुच केली. बहादुर खान हा पुढे कुच करत पारनेर मार्गे अहमदनगरला पोचला होता(तारीक-ए-दिलकुशा - औरंगजेब राजवट वर्ष १४). त्याचवेळी दिलेरखानची तुकडी ही पुण्याच्या दिशेने येत होती त्याने चाकण आणि पुणे काबीज केले- यावेळी दिलेरखाना बरोबर सुमारे 60 हजार फौज असल्याची नोंद आहे(ऑर्मे sec 1). स्वराज्यावरच्या या दुहेरी आक्रमणाचा सामना करण्याआधी महाराजांनी साल्हेरच्या वेढ्याची व्यवस्था लावण्याची योजना केली. त्यावेळी मोगल प्रदेशात असलेले सरनोबत प्रतापराव गुजर तसेच कोकणात असलेले मोरोपंत पेशवे यांच्याकडे पत्र घेऊन जासूद पाठवण्यात आले. प्रतापरावांनी वर घाटाकडून आणि मोरोपंत यांनी कोकणातून वर चढून येऊन एकाच वेळी साल्हेरवर हल्ला करावा अशी महाराजांची योजना होती. दोघांकडेही त्यावेळी प्रत्येकी दहा ते पंधरा हजार फौज असावी. असा दुतर्फा हल्ला करून साल्हेरला वेढा घालून बसलेल्या मोगली फौजेला कात्रीत पकडून एक जबरदस्त दणका देण्याचे हे नियोजन होते(सभासद बखर))
सभासदानी या वर्णन या युद्धाचे अतिशय विस्तृत असे वर्णन दिले आहे - एकूण हे युद्ध म्हणजे भयंकर रणकंदन होते असे दिसते. सभासद म्हणतो की चार प्रहर दिवस युद्ध झाले आणि युद्ध सुरू होताच पृथ्वीचा धुराळा असा उडला की तीन कोश औरत चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते. दोन्ही बाजूंनी मिळून बरीच जीवितहानी या युद्धात झाली - साधारण दहा हजार लोक दोन्हीकडचे मिळून मारले गेले. हे झाले फक्त सैनिकांचे - हत्ती, घोडे ,उंट वगैरे जनावरांची तर गणतीच नाही. सभासद पुढे लिहितो की रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहाले त्यामध्ये रुतो लागले. अतिशय तुंबळ आणि घनघोरअसा संग्राम होऊन शेवटी इख्लासखान आणि बेहलोलखान यांच्या मोगल सेनेचा पूर्ण पाडाव झाला. (सभासद बखर) चिटणीसाच्या वर्णनानुसार वेढ्यावर मराठ्यांनी तुफान हल्ला चढवला आणि परिणामी इख्लासखान आणि दिलेरखान हे दोघेही वेढा सोडून पळून जाऊ लागले. त्यावेळी या दोघांच्या गाठून मराठा फौजणे त्यांना चांगला चोप दिला - चिटणीसाचे वर्णन नुसार 5000 माणूस पठाण मारला गेला. माघार घेऊन पळून दिलेरखान औरंगाबादेस पोचला. (चिटणीस बखर)
युद्धाचे परिणाम मुघलांसाठी फार भयानक होते - खासा इख्लासखान आणि बेहलोलखान यांच्यासह मोगलांचे 30 मुख्य अधिकारी पकडले गेले(EnglishRecordsonShivaji - 293, सभासद - २२ अधिकारी म्हणतो ). याचबरोबर सुमारे सहा हजार घोडे, सव्वाशे हत्ती, सहा हजार उंट, अगणित मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कपडे आणि असंख्य बिछायत हे प्राप्त झाले. या युद्धात प्रतापराव आणि मोरोपंत यांच्याशिवाय ज्या महायोद्धांनी पराक्रम गाजवला त्यांची नावे सभासद आपल्याला देतो ती अशी - आनंदराव ,व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ व मुकुंद बल्लाळ. युद्धात मराठा फौजेला एकमेव मोठी हानी झाली ती म्हणजे सूर्याजी काकडे यांच्या रूपाने. हा योद्धा इतका तेजस्वी होता की सभासद त्यांचे - भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा योद्धा असे वर्णन करतो. मोठे रण गाजवून आणि अतुलनीय पराक्रम केल्यानंतर जंबुरीयाचा गोळा लागून सूर्याजी काकडे स्वराज्याच्या कामावर शहीद झाले.(सभासद बखर)
युद्धाची वार्ता ऐकून महाराज खूप खुश झाले - मोरोपंत आणि प्रतापराव यांनी त्यांना सोपवलेली कामगिरी शंभर टक्के यशस्वी केली होती. राजेंनी साखरा वाटून आणि तोफांची सरबती करून विजय साजरा केला. जे जासूद वार्ता घेऊन आले होते त्यांना सोन्याचे कडी बक्षीस दिले. तसेच प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव ,व्यंकाजीपंत आणि इतर सगळ्या शूर सरदारांना, मावळ्यांना योग्य ते बक्षीस देऊन नावाजण्यात आले. बेलोल खान आणि इतर उमरावांची सन्मानाने सुटका करण्याचा हुकुमही राजांनी पाठवला.(सभासद बखर,चिटणीस बखर) एकूण काय तर भौगोलिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या साल्हेरच्या भागात हि खूप मोठी लढाई महाराजांच्या दोन पराक्रमी शिलेदारांनी फत्ते केली होती - ह्या गोष्टीचे महाराजांना खूप समाधान आणि आनंद वाटला.
साल्हेर युद्धाचे दूरगामी परिणाम
Comments