शाहू महाराजांची स्वराज्यवापसी
- आदित्य गोखले
- Dec 16, 2022
- 7 min read
Updated: 2 days ago
शाहू महाराजांवर अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्रचंड मोठे आसमानी संकट कोसळले. संभाजी महाराजांच्या बलिदानाने त्यांच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र अचानक हिरावले गेले - इतकच नव्हे तर त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाईसाहेब यांच्यासह ते रायगडला मोगलांच्या वेढ्यातअडकले. ३ नोव्हेंबर १६८९ ला शेवटी जेव्हा रायगड मोघलांच्या हती पडला तेव्हा ते मोगलांच्या कैदेत सापडले - इथून पुढची जवळजवळ १७ ते १८ वर्ष त्यांनी मोगलांच्या कैदेत औरंगजेबाच्या छावणीत काढली.
शाहू महाराजांची अखेर सुटका
फेब्रुवारी १७०७ ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सिंहासनासाठी त्याच्या मुलांमध्ये स्पर्धा चालू झाली. त्यावेळी त्याचा दुसरा मुलगा आजमशाह हा दख्खनेत होता तर वरिष्ठ मुलगा शहाआलम हा काबूलचा सुभ्यावर होता. त्यात आजमने स्वतःला मोगल बादशहा घोषित करून टाकले.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्वरेने आजमशाह व शहाआलम ह्यांनी आपापल्या ठिकाणाहून दिल्ली-आग्राकडे कुच केली.(खाफी खान - औरंगजेब राजवट वर्ष ५१) आजमने दख्खनेतून कूच करताना आपल्याबरोबर शाहू महाराज व त्यांच्या परिवाराला ही बरोबर घेतले होते. याच सुमारास अखेर शाहू महाराजांची सुटका झाली.
शाहू महाराजांच्या सुटकेबद्दल आपल्याला वेगवेगळ्या साधनात वेगवेगळी अशी वर्णने सापडतात. मोगल इतिहासकार खफीखान ह्याच्यानुसार शाहू महाराजांची सुटका नर्मदे जवळच्या दोराहा या गावात आजमची छावणी पडलेली असताना झाली. खफी खानाच्या वर्णनानुसार मोगलांचा दक्खन मधला प्रमुख सेनापती जुल्फिकार खान ह्याने स्वतः अजमशाहाकडे शाहू महाराजांच्या सुटकेबद्दल बोलणी केली. खफी खान पुढे म्हणतो की जुल्फिकार खानाच्या विनंतीला मान देऊन अजमशाहा याने शाहू महाराजांची सुटका केली व ते केवळ ५० ते ६० लोकांसह अजमच्या छावणीतून बाहेर पडले.(खफी खान - Elliot Dawson खंड ७ - पृ ३९५)
याच्या उलट काव्येतिहाससंग्रह मधल्या हकीकतीनुसार शाहू महाराज आणि त्यांचा परिवार हे दिल्लीत अटकेत असताना त्यांची दिल्लीहून सुटका करण्यात आली. औरंगजेबाची मुलगी झीनत-उन-निसा हिने स्वतः बादशाजवळ शाहूची सुटका करण्याची विनंती केली होती. पुढच्या हाकिकतीनुसार शाहू महाराज दिल्लीहून सुटका होऊन रवाना झाले तेव्हा त्यांच्याबरोबर दहा हजार फौज दिमतीला होती(काव्येतिहाससंग्रह ४९४). नागपूरकर भोसले बखरीतल्या हकीकतीनुसार जुल्फिकार खान यांनी बेगम झीनत-उन-निसाकडे शाहू महाराजांची सुटका करण्याविषयी अर्ज दिल्याचे हकीकत कळते. या विनंती प्रमाणे शाहू महाराजांची सुटका होऊन ते पाच ते सात हजार फौजेनिशी आपल्या मुलखाच्या दिशेने परत निघाल्याचे वर्णन येते.(नागपूरकर भोसले बखर भाग १) शाहू महाराजांच्या सुटकेची अशी वेगवेगळी वर्णने असली तरी दोन गोष्टी प्रामुख्याने येथे दिसून येतात - एक म्हणजे की औरंगजेबानंतर दिल्लीच्या सिंहासनाच्या धुमश्चक्रीत महाराष्ट्रातून मोगल फौज माघारी गेली तेव्हा महाराष्ट्रात शाहू महाराजांना आपला मुतालिक करून करून ठेवण्याचा मनसुबा येथे दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या सुटकेमुळे स्वराज्यातल्या सरदार व राजकारण्यांच्या निष्ठेचा कस लागणार होता आणि कदाचित या अंतर्गत कलहामुळे स्वराज्य संपुष्टात येईल अशी विचारधारा असावी.
महाराजांचा स्वराज्यापर्यंतचा प्रवास व आगमन
आजमच्या छावणीतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराज माळव्यातून नर्मदा आणि नंतर तापी नदी पार करून महाराष्ट्र भूमीत खानदेशात पोहोचले. खफी खानाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या प्रवासात त्यांना मुख्यत्वे दोन लोकांची खूप साथ मिळाली. त्यापैकी त्यापैकी पहिला होता सुलतानपूर, बिजागड, नंदुरबार या भागाच्या जमीनदार मोहन सिंग. त्याने महाराजांना आवश्यक ती सामग्री देऊन पुढे वाटचाल करण्यास मदत केली. (पुढे शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात या मोहन सिंगाच्या मुलांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशावर हल्ला व लुटा लूट करू नये असे आदेश दिले होते). तिथून पुढे महाराजांना तापी नदीकाठी कोकरमुंडा हा किल्ला ज्याच्या ताब्यात होता त्या मराठा सरदार अबू पांडे (खफी खानाने दिलेले नाव) ह्याची खूप मदत झाली. त्याने महाराजांना आवश्यक साधनसामग्री व थोडीशी फौज पुरवून महाराजांच्या पुढच्या खानदेश पर्यंतच्या प्रवासास साहाय्य केले.(खफी खान - Elliot Dawson खंड ७ - पृ ३९५) अशा तऱ्हेने मजल दरमजल करत अखेर शाहू महाराजांची स्वारी खानदेशातल्या लांबकनी या ठिकाणी आली. एके कोणी रखमाजी किन्हळे ह्यांना शाहू महाराजांनी लिहिलेल्या पत्रात ह्या लांबकनीच्या मुक्कामाची खात्री होते(राजवाडे खंड ६ - ६)
दुसरीकडे चिटणीस बखरीमधल्या वर्णानुसार शाहू महाराजांची स्वारी ही राजस्थानातील जयपूर, जोधपूर, उदयपूर अशा विविध ठिकाणच्या राज्यांकडून पाहुणचार व मेजवानी स्वीकारत स्वीकारत पुढे गेली. या सगळ्या उमरावांकडनं सामग्री व फौजेची मदत मिळत मिळत शेवटी शाहू महाराज खानदेशात येऊन पोचले. परंतु चिटणीसाचे हे वर्णन थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण वाटते.
लांबकनीच्या मुक्कामात मात्र अनेक नामवंत सरदार आणि कारभारी हे शाहू महाराजांना येऊन मिळाले. इथे मुख्यत्वे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांचे स्वराज्याचे असलेले भावनिक नाते आणि इतक्या वर्षाच्या कैदेनंतर त्यांचे सुटून मायदेशी येणे या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या होत्या. त्यांना येऊन मिळालेल्या सरदारांपैकी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे परसोजी भोसले - आपल्या फौजेच्या तुकडीसह परसोजी शाहू महाराजांना मिळाल्यावर त्यांचे बळ कित्येक पटीने वाढले. परसोजींच्या मागोमाग नेमाजी शिंदे ह्यांच्यासारखे मातब्बर सरदार, रुस्तमराव जाधव, केसो त्रिमल पिंगळे, चांबळीचे सरनाईक , पुरंदरे , पंताजी शिवदेव, आनंदराव महादेव असे एक ना अनेक मराठा मंडळी शाहू महाराजांच्या छावणीत जमा झाले (मराठा रियासत खंड ३).जे येऊन मिळाले त्यांना किताब, वस्र-जवाहीर व जबाबदाऱ्या देऊन महाराजांनी त्यांचा यथायोग्य असा बहुमान केला.
असा सगळा जमाव झाल्यावर सुमारे २५ हजार फौजेसह महाराजांची स्वारी प्रथम गोदावरी ओलांडून येऊन पोचली ते अहमदनगरला !!
महाराणी ताराबाईंची प्रतिक्रिया - यादवीचे संकेत
त्यावेळी स्वराज्यावर अधिपत्य होतं ते महाराणी ताराबाई आणि छत्रपती असलेले त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांचे परंतु अशा परिस्थितीत शाहू महाराज कैदेतून सुटून स्वराज्यात दाखल झाल्यामुळे त्या ठिकाणी आता थोडा स्वराज्यावरच्या अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला. शाहू महाराज स्वराज्यात दाखल होताच महाराणी ताराबाई यांनी हा कोणीतरी तोतया शाहू आहे अशी बातमी उठवली. नागपूरकर भोसले बखरीत ह्या तोतयाची खातरजमा करण्याच्या प्रकरणाचा विस्ताराने उल्लेख येतो. प्रथम चिटणीस खंडो बल्लाळ यांना व नंतर स्वराज्याचे जुने जाणते आणि परसोजींचे बंधू बापूजी भोसले यांना शाहू महाराजांचा खरेपणा पडताळून बघण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु शाहू महाराज हे कैदेत असतानाही त्यांचे स्वराज्यातल्या मंडळींशी असणारा संपर्क आणि देवाण-घेवाण तसेच त्यांच्याबरोबर आलेले जोत्याजी केसरकर वगैरे लोक या गोष्टींमुळे वरील दोन्ही माणसांनी शाहू महाराज खरे असल्याचे ग्वाही दिली. एवढेच काय पण परसोजी-बापूजी ह्या उभयतांनी तर महाराजांबरोबर एकाच ताटात जेवण करून तोतयापणाची सगळी शंकाच मिटवून टाकली. .(नागपूरकर भोसले बखर - भाग १)
यानंतर मात्र ताराबाईंचे धोरण थोडे वेगळे आणि स्पष्ट होते - १७ सप्टेंबर १७०७ चा एका पत्रात (मराठा रियासत खंड ३) त्यांचे मनोगत कळते ते थोडक्यात खाली देतो :
१. त्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य हे संभाजी महाराजांनी घालवले आणि राजाराम महाराज व स्वतः ताराबाई यांनी त्याचे पुनर्निर्माण केले त्यामुळे शाहू महाराजांना स्वराज्यावर काही एक अधिकार नव्हता
२. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे असे म्हणणे की खुद्द शिवाजी महाराजांनीच हे राज्य राजाराम महाराजांना देऊ केले असल्यामुळे शाहू महाराजांचा यावर काही एक अधिकार बसत नाही
असा विचार मनात धरून महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांशी युद्धाची तयारी केली. त्यांच्या पक्षातल्या सगळ्या मातब्बर लोकांकडून त्यांनी इमानदार राहण्याबद्दल दूध भाताची शपथ घेतली - ह्यात रामचंद्रपंत आमात्य , परशुराम त्रिंबक प्रतिनिधी, शंकराजी नारायण सचिव, सेनापती धनाजी जाधव असे त्यांच्या पक्षातले मोठमोठे लोक सामील होते (चिटणीस बखर , कव्येतिहाससंग्रह ४९४). त्यांनी आपल्या प्रशासकीय व सैनिकी अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या हे १६ सप्टेंबर १७०७ ला पारनेरच्या देशमुख-देशपांडे यांना उद्देशून दिलेल्या पत्रातून कळून येते. या पत्रात त्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे लिहितात की शाहू महाराजांचे कुठलेही हुकूम व कागदाची दखल घेऊ नये - तसेच परगण्याचा वसूल त्यांना अजिबात देऊ नये. या उलट त्या परगण्याचा जो ताराबाईंकडचा सुभेदार होता त्याच्या अज्ञात राहण्याचे सक्त आदेश या पत्रात दिलेले दिसतात.(सनदापत्रे प्रकरण ५ - ४६) म्हणजेच जसे जसे शाहू महाराज पुढे सरकतील तसे तसे तिथले सैनिकी व प्रशासकीय अधिकारी हे त्यांना सामील होतील याची कुठेतरी त्यांना जाणीव आणि भीती होती.
खेड-कडूसची निर्णायक लढाई
चाळीस हजाराची फौज बरोबर देऊन महाराणी ताराबाईंनी प्रतिनिधी आणि धनाजी जाधव यांना शाहू महाराजांवर पाठवले. तसेच सचिव आणि पेशवे यांनी आपल्या प्रदेशात राहून गडकिल्ल्यांची व प्रदेशाची राखण करावी अशी योजना केली. ही चाळीस हजाराची फौज कुच करत भीमा नदीच्या काठाला खेड-कडूस गावाशी पोचली. त्याचवेळी भीमा नदीच्या पलीकडे शाहू महाराजांची २५००० ची फौज उभी होती. आता या दोन्ही फौज एकमेकाला भिडणार याच्या आधी या अख्या प्रसंगाला कलाटणी देणारी एक घटना घडली.
थोडक्यात सांगायचं तर सेनापती धनाजी जाधव यांच्या मनाचा ओढा हा शाहू महाराजांकडे होता असे दिसते - त्यामुळे त्यांनी केवळ दिखाव्याचे युद्ध करून शेवटी शाहू महाराजांच्या पक्षात सामील व्हायची योजना केली होती. चिटणीस बखरीतल्या वर्णनानुसार धनाजी रावांनी आपल्या जवळच्या सर्व सरदारांशी मिळून हा मनोदय आधीच पक्का केला होता. आपला हा मनोदय महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच एकदा शेवटची खात्री पटवण्यासाठी त्यांनी खंडो बल्लाळ ह्यांना गुप्तरीतीने महाराजांकडे पाठवले. खंडो बल्लाळनी सुद्धा अतिशय हुशारीने ही मसलत साधून धनाजीरावांचा मनोदय महाराजांपर्यंत पोहोचवला.(चिटणीस बखर , कव्येतिहाससंग्रह ४९४) ह्याच्यापेक्षा थोडसं वेगळं वर्णन आपल्याला नागपूरकर भोसले बखरीत सापडते. तिथल्या वर्णनुसार धनाजी जाधव यांना शाहू महाराजांच्या पक्षात आणण्याच्या मसलतीत खंडो बल्लाळ आणि बाळाजी विश्वनाथ हे दोघेही सामील असल्याची माहिती मिळते. ह्या दोघांच्या हुशार मुत्सद्दीपणामुळे आणि धनाजीरावांना मनातून शाहू महाराजांबद्दल ओढा असल्यामुळे त्यांचा शाहू महाराजांना सामील होण्याचा निर्णय पक्का झाला.(नागपूरकर भोसले बखर - भाग १)
दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर 1707 ला जेव्हा दोन्ही फौजत मोठी लढाई झाली तेव्हा ताराबाईंकडून प्रतिनिधी व त्यांचे सरदार आणि महाराजांकडून परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर यांनी लढाईची पराकाष्टा केली. चिटणीसाच्या वर्णनानुसार धनाजी रावांनी केवळ दिखाव्यापुरते युद्ध केले व जसे महाराजांचा हत्ती त्यांच्या घोड्यापाशी पोहोचला तेव्हा त्यांनी खाली उतरून महाराजांना मानाचे मुजरे केले. आपले जवळचे सर्व सरदार आणि फौज यांच्यासह ते शाहू महाराजांसमोर हजर झाले..(चिटणीस बखर) इकडे प्रतिनिधी हे पळून जाऊन त्या दिवशी चाकणला आपल्या फौजेसह राहिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी युद्धाची तयारी चालवली पण त्यांचीच फौज त्यांना लढाईसाठी साथ द्यायला तयार होईना. फितुरीची शंका धरून आणि कठीण प्रसंग ओळखून प्रतिनिधी हे माघारी परत साताऱ्याच्या किल्ल्यात गेले( कव्येतिहाससंग्रह ४९४) आणि तिथून घडलेली हकीगत महाराणी ताराबाईंना त्यांनी कळवली. अशा तऱ्हेने या पहिल्याच मोठ्या युद्धात शाहू महाराजांचा अतिशय दणदणीत असा निर्णायक विजय झाला. ह्या घटकेपासून त्यांचा स्वराज्यावरचा अधिकार हा बळकट झाला - खेड कडूसच्या ह्या युद्धाने शाहू महाराजांचा स्वराज्याचे छत्रपती होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सचिव आणि प्रतिनिधी पराभूत - साताऱ्यावर ताबा
खुप छान माहीती सोप्या शब्दात वर्णन केली👍🏼