महत्वाकांक्षी राजाराम महाराज
- आदित्य गोखले
- Dec 5, 2023
- 5 min read
संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतच औरंगजेब स्वतः भल्यामोठ्या फौजेसह दक्खनेत उतरला होता. संभाजी महाराजांच्या हयातीत त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही साफ बुडवली , पण स्वराज्याच्या विरुद्ध मोहिमेत त्याला थोडंफार ही यश मिळाले नव्हते. महाराजांच्या दुर्दैवी कैद आणि बलिदानानंतर मात्र परिस्थिती काही वेळ एकदम पालटली. मोगली फौज अनेक आघाड्यांनी स्वराज्यात घुसली. इतकेच काय खुद्द रायगडाला वेढा पडला आणि १६८९ ला कित्येक किल्ले मोगलांच्या हाती सापडले(जेधे शकावली). अशा परिस्थितीत स्वराज्याची धुरा येऊन पडली ती राजाराम महाराजांच्या हातात. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मराठा साम्राज्य आणि स्वराज्य टिकवण्याची अवघड कामगिरी आता महाराजांना पार पडायची होती.
कारकिर्दीची कठीण सुरुवात
रायगडाला २५ मार्च १६८९ ला वेढा पडल्यानंतर राजाराम महाराज आणि काही कारभारी-सरदार ह्यांनी वेढ्यातून बाहेर पडायची एक धाडसी योजना बनवली. त्यानुसार ५ एप्रिल १६८९ ला ह्या सर्व मंडळींनी वेढ्यातून निसटत जिंजीकडे प्रवास चालू केला. प्रत्येक दिवशी अनेक संकटांना तोंड देत राजाराम महाराज अखेर नोव्हेंबर १६८९ च्या मध्यात जिंजीला पोचले(जेधे शकावली). ह्यावेळी स्वराज्याचा महाराष्ट्रातला बराच मुलुख आणि किल्ले हे मोगलांच्या हाती सापडले होते. राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातला स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी रामचंद्रपंत अमात्य आणि सचिव शंकराजी नारायण ह्यांना ठेवले होते. तसेच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन स्वराज्याचे परमयोद्धे दोन्ही आघाड्यांवर - महाराष्ट्र आणि दक्षिण - मोगलांवर झंझावाती हल्ले चढवत होते
अशावेळी औरंगजेबाने आपल्या फौजा चहूबाजूंनी स्वराज्याचा प्रदेश आणि गड किल्ले काबीज करायला पाठवल्या होत्या. त्याचवेळी त्याने झुल्फीकारखानला जिंजीच्या मोहिमेवर राजाराम महाराजांना पकडायला अथवा मारायला पाठवले होते. अशी महाकठीण वेळ राजाराम महाराजांवर आली होती - ध्यानीमनी नसताना अचानक मराठा स्वराज्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले, चोहोबाजूंनी गनिम स्वराज्यात घुसला होता आणि प्रदेश व किल्ले काबीज करण्याच्या तयारीत होता.
पण तशाही परिस्थितीत घाबरून न जाता राजाराम महाराजांच्या डोक्यात काही अतिशय महत्वकांक्षी योजना चालू होत्या - याची काही उदाहरणे आपण येथे पुढे बघू
स्वराज्याचे किल्ले परत घ्यायची योजना
नोव्हेंबर १६८९ मध्ये राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्यानंतर महाराष्ट्रात राजगड, तोरणा, रोहिडा वगैरे बरेच किल्ले रामचंद्रपंत , शंकराजी, संताजी व धनाजी यांनी परत मिळवले(जेधे शकावली). स्वराज्याचा अजून एक महत्त्वाचा किल्ला असलेला किल्ले पुरंदर मोगलांकडून परत घ्यावा अशी राजाराम महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. १२ डिसेंबर १६९० ला त्यांनी अनेक सरदार व कोळी बांधवांना लिहिलेले एक पत्र आहे. त्यामध्ये या मंडळींना ते किल्ले पुरंदरची मोहीम सोपवतात आणि तो लवकर हस्तगत करण्याची आज्ञा देतात (पेशवे दफ्तर ३१ - ५०). म्हणजे जिंजीला पोचल्यावर केवळ केवळ एका वर्षाच्या आतच अशा तऱ्हेच्या योजना महाराजांच्या डोक्यात होत्या.
दुसरे एक महाराजांचे पत्र आहे ते आहे १३ मे १६९२ चे- हे पत्र आपल्याला दर्शवते की त्यावेळी राजाराम महाराजांनी खुद्द राजधानी रायगड मोगलांच्या ताब्यातून सोडवण्याची मोहीम आखली होती. हे पत्र महाराजांनी आपल्या काही सरदार लोकांना लिहिले आहे आणि त्यात ते त्यांना रायगड परत जिंकून घेण्याची आज्ञा करतात. पत्रात पुढे अशी नोंद आहे की आबाजी सोनदेव यांच्यावर ही रायगडची कामगिरी सोपवण्यात आली होती. सदर पत्राद्वारे या समस्त सरदारांनी आबाजी सोनदेव यांना सामील होऊन ही कामगिरी यशस्वी करण्याबद्दल लिहिले आहे. रामचंद्रपंत ह्यांनाही या मोहिमेची कल्पना दिल्याचे महाराज लिहितात. ते सुद्धा जी हवी ती उपाययोजना आणि मदत करतील असे आश्वासन देतात(राजवाडे खंड ८ - ४३). या पत्रावरून असे स्पष्ट दिसून येते की प्रचंड संख्येच्या गनिमाने घाबरून न जाता राजाराम महाराज जिंजीला नुसतेच स्वस्थ बसले नव्हते. ह्या उलट गमावलेले किल्ले आणि प्रदेश हे परत घेण्याचे मनसुबे ते आखत होते
दिग्विजयी महत्वाकांक्षेचा मनसुबा
पण राजाराम महाराजांच्या महत्त्वाकांक्षेचा कळस म्हणता येईल असे १६९२ चे एक पत्र आहे. हे पत्र त्यांनी हिंदुराव घोरपडे यांना संबोधिले आहे. ह्या पत्रात ते दोन्ही घोरपडे बंधूंना (हिंदुराव आणि कृष्णाजी) खूप मोठा प्रदेश हस्तगत करण्याची आज्ञा देतात. ह्या योजनेचा सर्वोच्च बिंदू असतो तो थेट दिल्ली काबीज करण्याचा !!
ह्या पत्राच्या तपशीलाप्रमाणे हिंदुराव व कृष्णाजी ह्यांना एकूण ६००००० (सहा लक्ष) होनांचा सरंजाम राजाराम महाराज कबूल करतात. त्यांना जी मोहीम सांगतात ती फक्त स्वराज्यपुरती मर्यादित न ठेवता विजापूर, भागानगर आणि शेवटी खुद्द दिल्ली घेण्याची योजना असते. ह्या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यानंतर देण्यात येणाऱ्या सरंजामाचे तपशीलवार वर्णन पत्रात आले आहे - ते खालीलप्रमाणे (आकडे होनांचे)
१. रायगड प्रांत कबज जालियावर
हिंदुराव (६२५००) - कृष्णाजी (१२५००)
२. विजापूर हस्तगत जाल्यानंतर
हिंदुराव (६२५००) - कृष्णाजी (१२५००)
३. भागानगर घेतल्यास
हिंदुराव (६२५००) - कृष्णाजी (१२५००)
४. औरंगाबाद घेतल्यावर
हिंदुराव (६२५००) - कृष्णाजी (१२५००)
५. दिली घेतलेवरी
हिंदुराव (२५००००) - कृष्णाजी (५००००)
अशा तर्हेने ह्या दिग्विजयी मोहिमेचा एकूण सरंजाम - हिंदुराव ५,००,००० आणि कृष्णाजी १,००,००० असा होता(शिवचरित्र साहित्य खंड ५ - ७६७).
ह्या योजनेत दोन अतिशय दूरदर्शी आणि महत्त्वकांक्षी हेतू दिसतात :
१. युद्धक्षेत्र स्वराज्य पुरते मर्यादित न ठेवता ते मोगली क्षेत्रात पसरवणे
२. मोगलांचा डाव त्यांच्यावरच उलटवून त्यांना स्वतःच्या प्रदेशाचा बचाव करायला भाग पाडणे- ज्याने स्वराज्यावरचे आक्रमण बोथट झाले असते
मोगल प्रदेशात आक्रमणाच्या योजना
वरील पत्राला अनुसरूनच आणखीन दोन महत्त्वाच्या घटना येथे नमूद कराव्याशा वाटतात :
१. कृष्णाजी सावंत यांनी १६९९ च्या अखेरीस म्हणजे राजाराम महाराजांच्या राजवटीतच नर्मदा पार करून माळव्यावर स्वारी केली. मोगलांच्या छावणीत असलेला त्यांचा इतिहासकार भीमसेन सक्सेनाच्या मते मुसलमान राजवटी आल्यापासून मराठ्यांनी अशा रीतीने नर्मदा कधीच पार केली नव्हती(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४२)
२. २५ ऑक्टोबर १६९९ च्या मोगली अखबरात एक महत्त्वाची नोंद मिळते. त्यानुसार तेव्हा राजाराम महाराज हे स्वतः सातारा वरून चार कोस पुढे आले होते आणि तिथे त्यांनी निगुनबख्त या बंडखोर गोंड राजाच्या वकिलांची भेट घेतली. दोघांनी मिळून मोगलांवर हल्ला करावा असा काहीतरी या भेटीचा हेतू असावा. पुढे धनाजीराव व दादो मल्हार हे सरदार राजाराम महाराजांना जिंजीला जायचा सल्ला देतात. परंतु महाराजांची महत्त्वाकांक्षा होती की प्रथम सुरत बंदर वर हल्ला करून तिथून वऱ्हाड, हैदराबाद या मार्गाने जिंजीकडे जावे. म्हणजे त्यांच्या डोक्यात यावेळी स्वतः मोगल प्रदेशात घुसून हल्ला करायची योजना चालू होती असे दिसते(मोगल दरबाराची बातमीपत्र खंड १)
३. ४ नोव्हेंबर १६९९ च्या बातमीपत्रात वरच्या मोहिमेचा पुढील वृत्तांत मिळतो. राणोजी घोरपडे , धनाजी जाधव , दादो मल्हार यांच्यासह महाराज अकरा हजार फौज घेऊन साताऱ्याहून चंदन-वंदनला गेल्याची नोंद येते. तिथून पुढे येथे ते उदरगीला गेले - जिथे त्यांना १२००० फौज अजून येऊन मिळाली. तिथून त्यांचा सुरत बंदरावर हल्ल्याचा हेतू दिसतो असे बातमी देणारा सांगतो. यावर उपाय म्हणून औरंगजेबने आपला नातू बेदारबख्त ह्याला महाराजांच्या मागावर पाठवले(मोगल दरबाराची बातमीपत्र खंड १). त्यामुळे असे दिसते की राजाराम महाराजांना मोहीम आवर घेऊन पुन्हा माघारी फिरावे लागले(ग.प्र.शकावली)
सारांश
Comments