top of page

रायगड ते बहादूरगड

  • Writer: आदित्य गोखले
    आदित्य गोखले
  • Mar 25
  • 10 min read

मराठा स्वराज्याच्या इतिहासातला एक सर्वात दुर्दैवी काळ म्हणजे संभाजी महाराजांना एका बेसावध क्षणी कैद होणे आणि पुढे त्यांचे स्वराज्यासाठी बलिदान. त्याचवेळी हा काळ इतिहासाला पूर्ण कलाटणी देणारा असा ठरला. महाराजांच्या बलिदानमुळे एक नवीन ऊर्जा आणि चेतना घेऊन मराठ्यांनी शेवटी प्रचंड झुंजीनंतर मुघलांवर पूर्ण डाव उलटवला. आपल्या छत्रपती पदाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी मुघलांसमोर प्रचंड संघर्ष मांडला पण एका अर्थाने त्यांनी आपला जीव स्वराज्य कार्यासाठी ओवळून टाकून जणू काही मुघलांचा नाशच आरंभला.

या लेखात आपण मागोवा घेणार आहोत ते संभाजी महाराजांनी रायगड सोडल्यावर त्यांना प्रत्यक्ष कैद होईल पर्यंतच्या घटनांचा . ह्या साडेतीन ते चार महिन्याच्या घटनांच्या बाबतीत कुठलेही साधन जास्त बोलके नाही परंतु जे काही तुरळक संदर्भ उपलब्ध आहे त्यावरून थोडासा घटनाक्रम उभा करायचा हा प्रयत्न


महाराजांनी रायगड सोडतानाची परिस्थिती

जेधे शकावली मध्ये शके १६१० कार्तिक महिन्यात कवी कलश आणि शिर्के यांचे भांडण झाले आणि संभाजी महाराज रायगड सोडून त्यांच्या मदतीसाठी आल्याची नोंद मिळते. म्हणजे १६८८ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कधीतरी महाराजांनी रायगड सोडला आणि ते कवी कलशच्या मदतीसाठी गेले. तसेच पुढे माघ वद्य ७ ला म्हणजे १ फेब्रुवारी १६८९ ला संभाजी महाराज व कवी कलश यांना शेख निजामने पकडल्याची नोंद आहे. ह्याचा अर्थ की महाराजांनी रायगड सोडून त्यांना संगमेश्वरला कैद होईपर्यंत साधारण एक ३.५ ते ४ महिन्याचा अवधी होता. ह्या काळात कुठल्या घटना घडल्या हे बघण्याच्या आधी महाराजांनी रायगड सोडताना स्वराज्याची स्थिती काय होती ते आधी बघूया.

औरंगजेब कुतुबशाही संपून विजापूरची आदिलशाही संपवायला निघाला तेव्हा महाराजांनी कवी कलश यांना फौजेसह त्याच्या मदतीला पाठवले. तेव्हापासून बहुदा कवी कलश ह्यांचा मुक्काम हा पन्हाळा-विशाळगड या भागातच होता. हे किल्ले आदिलशाही सीमेजवळ असल्याने तिथून मदत कार्याचे नियंत्रण करणे सोपे जाईल म्हणून बहुदा ही व्यवस्था. ह्या काळात संभाजी महाराज हे वास्तव्याला रायगडलाच असावेत. कुठल्याही मोठ्या लष्करी मोहीमेवर महाराज गेल्याचे या काळातली नोंद नाही. हे दोघे असे दोन्हीकडे राहून स्वराज्याच्या बचावात्मक व्यवस्थेकडे लक्ष देत होते असे वाटते.

औरंगजेबाने सप्टेंबर १६८६ मध्ये कुतुबशाही आणि सप्टेंबर १६८७ मध्ये आदिलशाही संपवली आणि आता त्याचे लक्ष पूर्णपणे संभाजी महाराजांवर केंद्रित होते. १६८७-८८ मध्ये त्यांनी स्वराज्यात फितूरीचे विष पसरवून सीमेलगतचे आणि नाशिक-बागलाण भागातले बरेचसे किल्ले हस्तगत केले होते. तरीही त्याला कोकणात आणि पन्हाळा-रायगड या सह्याद्रीच्या अतिदुर्गम भागात अजिबातच यश मिळाले नव्हते. आता १६८८ चा पावसाळा संपल्यावर स्वराज्यावर एका तिहेरी आक्रमणाची औरंगजेबाने तयार केली होती ती अशाप्रकारे (मुंतुखाब-उल-लूबाब : औरंगजेब राजवट वर्ष ३३) :

१. शहजादा आजम याला ४०००० फौज देऊन चाकणच्या दिशेने पाठवण्यात आले होते व तो तिकडून स्वराज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत होता
२. अशीच एक भली मोठी फौज घेऊन एतिकाद खान हा खुद्द रायगडालाच वेढा घालण्यासाठी निघाला होता.
३. पराभूत कुतुबशाही कडून मोगलांकडे आलेला सरदार शेख निजाम (मुकर्रब खान) याला कोल्हापूर पन्हाळा भागात फौजेसह पाठवण्यात आले होते आणि बहुदा तो पन्हाळ्याला वेढा घालण्याचा मनसुब्याने उतरला होता

१६८८ ची अशी किमान दोन-तीन पत्र आहेत जे असे दर्शवतात की पन्हाळ्याला बसून सुद्धा कवी कलश हा स्वराज्याचा कारभार हाताळत होता. १६८८ च्या सुरुवातीला तिमाजी व रामाजी गोविंद यांच्या देशमुखच्या व्यवहाराबद्दल वाद होता. ते दोघे प्रल्हाद निराजींकडे गेले आणि अखेर हा सगळा मामला संभाजीराजांकडे गेला. महाराजांनी असे ठरवले की ज्याच्याकडे तीस-पस्तीस वर्षे देशमुखी चालली असेल तोच खरा देशमुख आणि या निर्णयास कवी कलश यांची पण संमती असेलेली दिसते. तेव्हा सहा जानेवारी १६८८ ला प्रल्हाद निराजी यांनी राजापूरच्या सुभेदारास हा निर्णय कळवला (राजवाडे खंड २१ - ४५)आणि लिहिले की तिमाजीच खरा. रामाजी गोविंद कथला करतो, त्यास कथला करावयास संबंध नाही. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून दुसरे एक पत्र कवी कलश यांनी स्वतः आठ जानेवारी १६८८ ला राजापूरच्या अधिकाऱ्यांना लिहिलेले आपल्याला मिळते( राजवाडे खंड २१ - ४६).

दुसरे पत्र कवी कलश याने तुलाजी देसाई याला लिहिलेले आहे (२७ मे १६८८) आणि या पत्रातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रात मलकापूरला असलेल्या मराठ्यांच्या पागेचा उल्लेख आहे(शिवचरित्रसाहित्य खंड ३ - ६४४). म्हणजे पन्हाळा, विशाळगड आणि मलकापूर अशी स्वराज्याची तिहेरी तटबंदी त्या भागात त्यावेळी दिसून येते.

दोन्ही पत्रांवरून असे दिसते की जरी कवी कलश यांचे वास्तव्य त्या काळात रायगडावर नव्हते तरीही प्रशासकीय कामात ते अतिशय सक्रिय होते. पन्हाळा-विशाळगड भागात राहून ते स्वराज्याची प्रशासकीय आणि इतर कामे पार पाडत होते.


संभाजी राजेंच्या हालचाली

जेधे शकावली कार्तिक महिना शके १६१० म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८८ ची नोंद सांगते की कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले आणि कलश पळोन खिलणियांवर गेला . पुढे माहिती आहे की त्याच महिन्याला संभाजी महाराज रायगडहून कलशाच्या मदतीसाठी आले आणि त्यांनी युद्ध करून शिर्क्यांना पळून लावले. जेधे शकावली मधल्या या नोंदीच्या शेवटी संभाजी महाराज खळणियास आले म्हणजे विशाळगडला गेल्याची माहिती मिळते (शिवचरित्रप्रदीप पृ ३४).

त्यावेळेसच वर म्हणल्याप्रमाणे मोगल सैन्य कोल्हापूरच्या भागात ठाणे करून होते. मुकर्रब खानला खास कोल्हापूर-पन्हाळ्याचा कामगिरी वर पाठवण्यात आले होते. त्यामुळे पन्हाळा आणि विशाळगड हे किल्ले त्या काळात अजूनच महत्त्वाचे बनले होते. विशाळगडला जाऊन संभाजी महाराजांनी किल्ल्याची तयारी आणि साधन सामग्री यांचा आढावा घेतला (मासिर-ए-आलामगिरी : औरंगजेब राजवट वर्ष ३२ / तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ३०). विशाळगड वरून ते पुढे पन्हाळ्याला गेले असावेत का ? मराठा किंवा मोगल कुठल्याही साधनात ते खेळण्या होऊन पन्हाळ्याला गेल्याची नोंद नाही. पण इसवी सन १७११ च्या एका कागदा नुसार मात्र संभाजी महाराज पन्हाळ्याला गेले होते असे सिद्ध होते. नरहर मल्हारच्या एका तक्रारीत राजे किल्ले पणालीयास आले असा स्पष्ट उल्लेख आहे. तिथे मल्हारांचा चुलत भाऊ कृष्णाजी कोनेर महाराजांना भेटला आणि त्याच्या महाजनकीची हकीकत त्याने महाराजांना सांगितले. हे प्रकरण संभाजी महाराजांनी प्रल्हाद निराजी न्यायाधीश यांच्याकडे सोपवून त्याचा काही निवाडा व्हायच्या आतच पन्हाळा सोडला होता. (शिवपुत्र संभाजी पृ ४६४-४६५)

यावरून १६८८ च्या अखेरीस फक्त संभाजी महाराज नाही तर प्रल्हाद निराजी हे सुद्धा पन्हाळ्यावर होते असे आपल्याला दिसते. ही बाब महत्त्वाची आहे जिचा तपशील आपण पुढे बघणार आहोत. ह्याच कागदात पुढे राजे रायगडाला निघाले आणि त्यांचा संगमेश्वरला मुक्काम असताना शेख निजाम आल्याची नोंद आहे. म्हणजे रायगड सोडल्यानंतर शिर्के ह्यांच्याशी युद्ध करून महाराज प्रथम खेळण्याला गेले असे दिसते. किल्ल्याची व्यवस्था लावून मग ते पन्हाळ्याला आले. मोगली फौज कोल्हापूर पन्हाळा भागात असल्यामुळे त्यांनी पन्हाळ्याची व्यवस्था आणि साधनसामग्रीची उपलब्धता बघितली असायची शक्यता आहे. हे सर्व करून आणि कृष्णाजी कोनेर यांचा महाजनकीची हकीकत ऐकून ते पुढे संगमेश्वर आणि रायगडला जायला निघाले होते.


काही महत्त्वपूर्ण घडामोडी

या काळात अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, घटना आणि कुरबुरी चालू होत्या ज्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या संभाजी महाराजांवर येणाऱ्या संकटाशी संबंध होता. जेधे शकावली मधली मार्गशीर्ष १६१० अर्थात डिसेंबर १६८८ ची नोंद सांगते की संभाजी राजे यांनी कलशाच्या बोले प्रल्हाद पंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले (शिवचरित्रप्रदीप पृ ३४). आपण वर बघितले आहे की काहीच दिवसापूर्वी पन्हाळ्यात संभाजी राजेंनी प्रल्हाद पंतांकडे कृष्णाजी कोनेर यांच्या महाजनकीचे प्रकरण सोपवले होते. त्याच्या थोड्याच दिवसानंतर त्यांना थेट कैदेत टाकण्यासारखी काय घटना घडली हे कळत नाही. कलशाच्या बोले असे म्हणले असल्याने आणि शिर्के-कवी कलश यांचे नुकतेच भांडण झाले असल्यामुळे असे वाटते की या लोकांवर शिर्क्यांना सामील असल्याचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली असावी. अटकेचे हेच कारण होते का दुसरी एखादी फितुरीची घटना घडली होती अथवा घडणार होती आणि म्हणून ह्या लोकांना पकडले हे कळायला मार्ग नाही.

शिर्के प्रकरणातल्या कुरबुरी आणि कटकटी हे संभाजी राजे आणि शिर्के युद्ध झाल्यानंतर चालूच होत्या. ह्या काळातल्या दोन घटना समोर येतात जे शिर्के आणि कवी कलश यांच्या मध्ये असलेले असमंजस आणि कुरघोडीचे वातावरण कसे होते ते पुढे आणतात. पाडळी गावची खोती विठ्ठल नारायण ह्या माणसाकडे वीस पंचवीस वर्षे होती. पण त्यांनी शिर्क्यांचे साथ दिली असा ठपका त्याच्यावर ठेवून कवी कलश यांनी त्याला धरून विशालगडला अटकेत ठेवले. त्याची खोती दूर करून गाव विशाल गडाचा हवालदार कृष्णाजी गोंडा याला दिले. पुढे २० एप्रिल १६८९ ला राजाराम महाराजांनी दिलेले पत्र ही सर्व हकीकत येते (ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ - ३२). राजाराम महाराजांनी विठ्ठल नारायणाला कैदेतून मुक्त करून त्याच्याकडून काढलेली खोती त्याला परत देऊ केली. अशा रीतीने असे दिसते की शिर्क्यांची जो साथ देईल त्यास कवी कलश यांच्याकडून शासन करण्यात येत होते.

दुसरे प्रकरण होते ते कोतळूक आणि मासू या दोन गावचे - यांचा मोकासा संभाजी राजे यांनी विठोजी शिर्के यांची भावजय काशीबाई यांना दिला होता. त्यापैकी मासू या गावात हरबा देसाई यांच्याकडे परंपरागत खोती होती . पेशवे दप्तर मधल्या एका पत्रात या झगड्याचे सविस्तर वर्णन आहे. पत्राच्या मजकुरानुसार देसाई याचे माणसाशी व शिर्के याचे राऊताशी कटकट जहाली. गोष्ट भांडण व हमरीतुमरीवर न थांबता खून आणि जाळपोळी वर गेली. देसाई यांचा रखवालदार धर्मा महार कवटेकर याला शिर्केंच्या राऊतांनी मारून पेढ्यात घातला आणि खाल्ल्यास व महारास आग दिली. याचे प्रत्युत्तर म्हणून देसाई यांनी कोतुळकला असलेली शिरक्यांची पागा उध्वस्त केली.(पेशवे दफ्तर ३१ - ४६)

अशा रीतीने छोटे मोठे झगडे आणि रस्सीखेच हे कवी कलश आणि शिर्के यांच्यात सुरू होती असे दिसते. या दोन्ही घटना साधारण १६८८ अखेरच्या किंवा त्यानंतरच्या ही असाव्यात. कदाचित या दोन घटनांपैकी एखादी घटना शिर्क्यांनी कवी कलशावर चालून जायला जबाबदार ठरली असेल. पण एकूण परिस्थिती अशी तयार झाली होती की एका छोट्या ठिणगीने सुद्धा वणवा पेटणार होता आणि दुर्दैवाने शेवटी तसेच झाले.


ह्या काळातल्या गनिमांच्या कारवाया

संभाजी राजांनी रायगड सोडला तेव्हा औरंगजेबची छावणी विजापूरला होती. पुढे तिकडे भयंकर ज्वराची साथ पसरल्याने तो विजापूरहून निघून अकलूजला आला. असे दिसते की मोगली हेर खात्याला संभाजी महाराज हे रायगडहून विशाळगडला आले आहेत अशी पक्की खबर होती. एवढेच नाही तर शिर्क्यांशी झालेले भांडण आणि ते सोडवण्यासाठी ते रायगड होऊन स्वतः विशाळगडला येणे ही घटनाही औरंगजेबाला ज्ञात होती. वजीर असद खानला पत्रात तो सांगतो की शेख निजाम ज्याला पन्हाळ्याच्या कामगिरीवर पाठवले आहे त्याने तातडीने जाऊन तिथल्या जमीनदाराला (म्हणजेच संभाजी महाराजांना) अटक करावी. पुढे तो लिहितो की तो जमीनदार बार्गी (शिर्के) यांच्याशी असलेले भांडण सोडवण्यासाठी राहबरी म्हणजे रायगडहून खळणेह म्हणजे विशाळगडला एकटा गेला आहे. त्यामुळे त्वरा करून या संधीचा फायदा घेऊन शेख निजामने त्या अभिमानी जमीनदाराला त्वरित हल्ला करून जेरबंद करावे (रुकात-ए-अलामगिरी पृ ११०-१११).

ह्याच्या थोडे आधी म्हणजे २९ सप्टेंबर १६८८ च्या अखबारात आधी मुल्तफत खानाच्या फौजेत खटाव जवळ असलेल्या नागोजी माने यांना औरंगजेब शेख निजामच्या सैन्यात सामील होण्याचा हुकूम देतो(मोगल दरबाराची बातमीपत्रे १).

अगदी याच काळातले म्हणजे याच तीन-चार महिन्यातले एक महत्त्वाचे आणि लक्षवेधी प्रकरण आहे ते म्हणजे सावंतवाडीचे देसाई खेम सावंत यांचे. फेब्रुवारी १६८५ मध्ये गोवेकर पोर्तुगीज आणि खेम सावंत यांच्यात संभाजी महाराजांविरुद्ध तह झाला होता. तेव्हापासून ते पोर्तुगीजांच्या आश्रयाने बार्देश मध्ये राहत होते. २१ ऑक्टोबर १६८८ च्या पत्रात औरंगजेब खेम सावंत यांना मोगली लष्करात सामील होण्यास सांगतो. तळकोकणात लष्करी ठाणे बसवून मोगली सेनेला रसद पोचवणे व मोगली आरमाराची सुरक्षा अशा जबाबदाऱ्या या पत्रातून तो खेम सावंत यांच्यावर टाकतो. याच्याबद्दल त्यांना कुडाळची सरदेशमुखी देण्याचे औरंगजेब लिहितो(संभाजीकलीन पत्रासारसंग्रह २७१). पोर्तुगीज व्हाईसरॉय १३ ऑगस्ट १६८८ ला आपल्या राजाला लिहितो की त्याच्या आश्रयाला असलेले कुडाळचे खेम सावंत देसाई, राम दळवी आणि इतर देसाई यांना मोगली सरदार बहादूर खान यांनी पत्र लिहून मोघलांच्या सैन्यात भरती होण्यास बोलवले आहे. पुढे तो लिहितो की हे सर्व सैन्य लवकरच कोकण जिंकण्याच्या मोहिमेवर निघणार आहे आणि खेम सावंत इत्यादी लोकांना मुघल सैन्यात भरतीची परवानगी मिळावी असा अर्ज करतो (पोर्तुगीज दफ्तर खंड ३ - पृ ५४-५५). खेम सावंत आणि इतर देसाई मंडळींना मोगली सैन्यात भरती होणे ची परवानगी देणारा ठराव पुढे २७ सप्टेंबर १६८८ च्या पत्रानुसार पास करण्यात आला असे दिसते (पोर्तुगीज दफ्तर खंड ३ - पृ ५४).

१५ डिसेंबर १६८८ च्या पत्रात बहादूर खान खेम सावंतांना कुडाळची सरदेशमुखी बहाल झाली आहे असा मजकूर लिहितो(संभाजीकलीन पत्रासारसंग्रह २७५). म्हणजे आता नुसते मुघलच नव्हे तर तळकोकणात खेम सावंत आणि गोवेकर पोर्तुगीज अशी तिहेरी आघाडी स्वराज्यविरुद्ध निर्माण झाली होती. ३१ जानेवारी १६८९ ला व्हॉइस रॉय पत्रात म्हणतो की मुघलांनी संभाजीचे कोकणातील सर्व राज्य घेऊन त्याच्याबरोबर फोंडा शहर ही घेतले आहे(पोर्तुगीज दफ्तर खंड ३ - पृ ५४-५५). म्हणजे सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन आघाड्या व्यतिरिक्त ही मोगल आणि खेम सावंत यांची अजून एक आघाडी तळकोकणातून संभाजी महाराजांविरुद्ध तयार झाली होती.


संभाजी महाराज संगमेश्वरला

संभाजी महाराज आणि कवी कलश हे खेळणा किंवा पन्हाळ्याहून संगमेश्वरला नक्की कधी आले याचा पत्ता लागत नाही. परंतु असे वाटते की जानेवारी १६८९ मध्ये कधीतरी ते रायगडला परत जायला निघाले असताना मध्ये संगमेश्वरला आले असावे.

ईश्वरदास नगर, भीमसेन सक्सेना आणि खफीखान हे तिघेही महाराजांना विशाळगडला कैद करण्यात आले असे म्हणतात म्हणजे त्यांना संभाजी महाराजांच्या संगमेश्वर च्या वास्तव्याचा तसेच संपूर्ण शिर्के प्रकरणाचा काहीच सुगावा नव्हता असे दिसते. साकी मुस्तैद खान मात्र बरोबर वृत्तांत देतो आणि महाराज रायगडाहून प्रथम खेळणा आणि खेळण्याहून संगमेश्वरला गेले असे म्हणतो. पुढे तो लिहितो की संगमेश्वरला कवी कलशाने बांधलेल्या उंच वाडे आणि सुंदर बागा यांच्यामध्ये महाराजांचे वास्तव्य होते (मासिर-ए-आलामगिरी : औरंगजेब राजवट वर्ष ३२). वास्तविक पाहता संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे वास्तव्य हे संगमेश्वरला सरदेसाई यांच्या वाड्यात होते हे आपल्याला माहिती आहे.

वर सांगितलेल्या हरबा देसाई याच्या प्रकरणात शेवटी तो शिर्क्यांची तक्रार घेऊन संभाजी महाराजांकडे संगमेश्वरला गेला असे म्हणले आहे. त्याची तक्रार ऐकून महाराजांनी विवादित गाव हे सरकार जमा केले अशीही नोंद आहे. हे पत्र जानेवारी १६८९ मधले आहे (पेशवे दफ्तर ३१ - ४६). यावरून असे दिसते की हरबा देसाई याला त्यावेळी महाराजांचे वास्तव संगमेश्वरला आहे हे माहीत होते आणि म्हणून तो तक्रार घेऊन महाराजांकडे संगमेश्वरला दाखल झाला. औरंगजेबाच्या हेरांनी वर सांगितल्याप्रमाणे शिर्क्यांचे भांडण व महाराज खेळण्याला असल्याची वार्ता त्याच्यापर्यंत पोचवली होती. पण तिथून महाराज संगमेश्वरला गेल्याची वार्ता त्याला लागलेली दिसत नाही.

संभाजी महाराज व कवी कलश व इतर मंडळी ही संगमेश्वरहून रायगडाकडे जाणार होती हे दोन्ही बाजूच्या जवळजवळ सर्व साधनातून आपल्याला वाचायला मिळते. संगमेश्वर मुक्कामी महाराजांनी पार पाडलेल्या शेवटच्या काही कारवायांपैकी एक कारवाई गिरजोजी यादव व अर्जोजी यादव यांच्या वतनाच्या निवाड्याबद्दल होती असे दिसते. ५ ऑक्टोबर १७१६ च्या एका तपशीलवार निवाडापत्रात ही हकीकत आली आहे. त्यात आलेल्या वर्णनाप्रमाणे शिर्क्यांच्या धामधुमी मुळे कवी कलश खेळण्यास गेले आणि संभाजी राजे ही लवकरच तिथे आले. तेथून दोघेही रायगडला जाण्यासाठी संगमेश्वरला आले. संगमेश्वरला संभाजी महाराजांनी वतनाच्या पत्रास परवानगी दिली. राजमुद्रेसह सर्व वतन पत्रे तयार झाली आणि फक्त सरकरकुनांचे शिक्के पत्रावर उमटवायचे बाकी होते. पण त्याच दिवशी - शेख निजाम गनीम येथे आला. त्या वाड्यात सनदा गेल्या - अशी नोंद आहे (ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ - ३३२). म्हणजे संभाजी महाराजांनी बहुदा हा केलेला शेवटचा निवाडा होय. यावरून असे सिद्ध होते की संगमेश्वरला ते कुठल्याही मद्याच्या किंवा चैनीच्या नशेखाली नव्हते आणि अगदी शेवटपर्यंत त्यांनी लोकांचे निवाडे हाताळले.

महाराजांना कैद झाल्यानंतर बरेच वर्षांनी १९ ऑक्टोबर १७७१ चे एक पत्र आहे त्याच्यात एक महत्त्वपूर्ण नोंद आहे. या पत्राच्या मजकूरानुसार संभाजी महाराजांना संगमेश्वरला नाही तर तिथून जवळच असलेल्या नावडी येथे मुघलांनी कैद केले(पेशवे दफ्तर ३९ - १३८). बाकी सर्व साधनातून कैदेचे ठिकाण संगमेश्वर किंवा खेळणा असे म्हणले असल्यामुळे ठिकाणाचे हे वेगळे आणि बहुदा अचूक वर्णन करणारे पत्र महत्वपूर्ण आहे.


सारांश - महाराजांचे शेवटचे काही दिवस

संभाजी महाराजांची छत्रपतीपदाची कारकीर्द जशी धामधुमीची होती तसेच त्यांचे शेवटचे काही महिने आणि दिवस सुद्धा. ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८८ ला शिर्के-कवी कलश प्रकरण मोडीत काढण्यासाठी त्यांनी रायगड सोडला आणि दुर्दैवाने ते परत कधी रायगडला जाऊ शकले नाहीत. त्यानंतर जवळजवळ सर्व साधनातून आपल्याला दिसून येते की ते विशाळगडला गेले होते आणि बहुदा किल्ल्याची तयारी आणि डागडुजी याच्याकडे सुद्धा त्यांनी जातीने लक्ष दिले असावे. नरहर मल्हार आणि कृष्णाजी कोनेर यांच्या प्रकरणावरून असे दिसते की ते विशाळगड वरून पन्हाळ्याला सुद्धा गेले होते आणि त्यावेळी प्रल्हाद निराजी सुद्धा तेथेच होते. त्याच प्रल्हाद पंताना आणि इतर काही लोकांना पुढे थोडे दिवसांनी कवी कलशच्या बोलण्यावरून महाराजांनी कैदेत ठेवले होते.

इथे हे शिर्के प्रकरण निकालात काढत असताना दुसऱ्या बाजूने मुघलांनी एक शेवटचा मोठा हल्ला करण्यासाठी तीन ते चार मोठ्या युद्ध आघाड्या उघडल्या होत्या असे दिसते. विजापूर आणि गोवळकोंडा घेताना जसे राजधानीला वेढा घातला तसाच मनसुबा करून औरंगजेबाने खुद्द रायगडाला वेढा घालण्यासाठी सुद्धा फौजा पाठवल्या होत्या. १६८७-८८ मध्ये सीमावर्ती भागातले बरेचसे किल्ले औरंगजेबाने फितुरीचे विष पसरून घेतले होते. संभाजी महाराजांचे काही लोकही मनसबेच्या लोभाने औरंगजेबाला सामील झाले होते (वाचा : संभाजी महाराज कैदेपूर्वी स्वराज्यातल्या घटना). संभाजी महाराजांच्या या शेवटच्या काळात भर पडली की कुडाळच्या खेम सावंत यांची. खेम सावंत यांच्या मदतीने तळ कोकणात ठाणी उभी करून कोकणात मोहीम करण्याचा मुघलांचा इरादा होता हे स्पष्ट आहे.

अशी सगळी स्थिती असताना एक मात्र नक्की की संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे वास्तव्य थोडे दिवस का होईना संगमेश्वरला होते. मोगली इतिहासकारांनी वर्णन केल्याप्रमाणे महाराज मद्याच्या नशेत ऐषारामात गुंतले होते हे मात्र खरे वाटत नाही. या धामधुमीच्या आणि अत्यंत निर्वाणीच्या काळात अशा रीतीने मौजेत राहणे ही कल्पना थोडीशी दुरापास्त वाटते. एक मात्र राहून राहून वाटते की संगमेश्वर हे ठिकाण प्रचंड दुर्गम असल्याने अशी शक्यता आहे की संभाजी महाराज हे शंभर टक्के सावध आणि तयारीत नव्हते. मुघल फौज इतक्या दुर्गम भागात इतक्या थोड्या वेळात आत येईल अशी त्यांना अपेक्षा नसावी असे दिसते. अखेर त्यांना दुर्दैवाने कैद होऊन त्यांना औरंगजेबापुढे बहादूरगडला नेण्यात आले. या पुढच्या काही दिवसांचा दुर्दैवी इतिहास तर आपल्याला सर्वज्ञातच आहे. असं होतं संभाजी महाराजांचा शेवटचा काळ - अत्यंत अल्पावधीचा म्हणजे तीन ते चार महिन्याचा - पण त्या काळात सुद्धा रायगड ते बहादूरगड याच्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या घटना घडत होत्या हे मात्र नक्की.





ความคิดเห็น


कुठलाही लेख किंवा अन्य माहिती कॉपी करू नये - सर्व हक्क सुरक्षित

नवीन लेख आणि अन्य माहिती च्या नोटिफिकेशन साठी subscribe करू शकता  

Subscribe केल्याबद्दल धन्यवाद !!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
Site Logos.png

महत्वाची सूचना - कुठल्याही लेखातल्या माहितीचे परवानगीशिवाय कृपया अनुकरण करू नये - तसेच कुठल्याही लेखातला मजकूर किंवा कुठलीही इमेज कॉपी करू नये - #History Blog #सह्याद्रीचे स्वराज्य

bottom of page