top of page

नेतोजींचा कैदेनंतरचा प्रवास - परकीय साधनातून

  • Writer: आदित्य गोखले
    आदित्य गोखले
  • Nov 4, 2024
  • 5 min read

नेतोजी पालकर - नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो एक रणझुंजार, तेजस्वी योद्ध्याचा अद्वितीय महापराक्रम. माणकोजी दहातोंडेंनंतर नेतोजीरावांकडे स्वराज्याचे सरसेनापतीपद सोपवण्यात आले. अफजलखान वधाच्या वेळी प्रतापगड युद्ध, त्यानंतरचा विजापुरी मुलखावर सुसाट हल्ला आणि स्वराज्य विस्तार, पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी महाराजांना सोडवायचे नेतोजींचे प्रयत्न, उंबरखिंडीचे युद्ध असे एक ना अनेक युद्धप्रताप सरनोबत नेतोजी पालकरांच्या हातून घडले.

आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी नेतोजी रावांना स्वराज्यातून बडतर्फ केल्यानंतर काही काळानंतर त्यांना मोगलांनी अटक केली.या लेखात त्यांच्या बडतर्फीची कारणे किंवा महाराज आणि नेतोजी यांनी हे ठरवून केलं होतं का याचे विश्लेषण न करता कशाप्रकारे अटक झाली आणि त्यानंतर मोगलाईत असताना त्यांची वाटचाल कशी होती ह्याचा मागोवा आपण घेऊया.


नेतोजींना अटक

जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले तेव्हा औरंगजेबला चांगलीच चपराक बसली. याच बरोबर बहुतेक त्याला अजून एक भीती वाटली असावी - की जर ह्या शिवाजी आणि प्रती शिवाजी यांची स्वराज्यात पुन्हा भेट झाली तर ते दोघे मिळून प्रचंड हाहाकार माजवतील. त्यानंतर नेतोजींना अटक होऊन जबरदस्तीने त्यांना मोगलाईत जावे लागले. त्यांच्या अटकेनंतरची फारशी हकीगत आपल्याला मराठी साधने किंवा कागदपत्र यातून मिळत नाही. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास कसा होता याचे वर्णन करण्यासाठी आपण या लेखात औरंगजेबाच्या दरबारातील अखबार तसेच समकालीन मोगल इतिहासकार यांचे लिखाण याचे संदर्भ मुख्यत्वे वापरलेले आहेत.

महाराज निसटल्यानंतर साधारण १९ ऑगस्ट १६६६ ला औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांना आदेश पाठवला ज्यात नेतोजींना कुठल्याही मार्गाने अटक करून दरबारी पाठवायला सांगितलेले आहे. या नोंदीमध्ये त्यावेळी नेतोजी हे मोगल सैन्यात पाच हजारी मनसबदार होते अशी आपल्याला माहिती मिळते (मासिर-ए-आलमगिरी : औरंगजेब राजवट साल ९)

यानंतर २६ सप्टेंबर १६६६ म्हणजे आदेश निघाल्यापासून साधारण एक महिन्यात नंतरच्या आखबारात आपल्याला मिर्झाराजांनी औरंगजेबाला नेतोजींना कैद केल्याची वार्ता दिलेली दिसते. म्हणजे साधारण सप्टेंबरच्या मध्यात कधीतरी मिर्झा राजांनी नेतोजींना कैद केले. (ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक २६ )

या सगळ्यापेक्षा थोडीशी वेगळी हकीकत आपल्याला मनूची सांगतो. मनुची हा इटालियन प्रवासी त्यावेळी भारतात होता आणि शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांच्या काळात अधून मधून त्याने अनेक वेळा मोगलाईत नोकरीही केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज निसटल्यानंतर आता नेतोजी सुद्धा निसटून जाऊ नये म्हणून औरंगजेबाने कैद करून जबरदस्तीने त्यांना मोगल सेवेत घेतले. एवढेच नाही तर महाबत खानाच्या सैन्यात सिंधू नदीच्या पलीकडे त्यांची ताबडतोब रवानगी झाली.(Storia Do Mogor - खंड २ पान १४०)


धर्मांतर आणि काबुलला रवानगी

त्यानंतरचे काही महिने नेतोजींना अटकेत ठेवून कदाचित त्यांच्यावर धर्मांतराचा प्रचंड दबाव टाकण्यात आला. कारण मार्च १६६७ च्या नोंदी प्रमाणे, म्हणजे अटक झाल्यापासून साधारण सात महिन्यानंतर, असे स्पष्ट दिसते की नेतोजींनी इस्लाम स्वीकारला होता व त्यांचे नाव बदलून मुहम्मद कुलीखान असे करण्यात आले. इतकेच नव्हे तर या धर्मांतरानंतर त्यांना तीन हजारी मनसबदारी बहाल करण्यात आली होती.(मासिर-ए-आलमगिरी : औरंगजेब राजवट साल १० )

यानंतरच्या सहा एप्रिल १६६७ च्या अखबारात औरंगजेबाने नेतोजींना स्वराज्यापासून दूर पाठवण्याची चालु केलेली खटपट ही स्पष्ट दिसून येते. नेतोजींना पंजमिरची ठाणेदारी बहाल करण्यात आल्याचे आपल्याला कळते. काही दिवस तिथला अनुभव घेतल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना गजनीची ठाणेदारी द्यायची असा औरंगजेबाचा मनोदय होता. म्हणजे काही झालं तरी शिवाजी महाराज आणि स्वराज्य यांच्यापासून कित्येक हजारो कोस दूर या प्रतिशिवाजीला पाठवण्याची तयारी झाली.(ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक ४३ )

याच महिन्यातल्या २१ एप्रिल १६६७ च्या आखबारात आपल्याला हकीकत सापडते की नेतोजींनी औरंगजेबाला अर्ज केला होता की त्यांच्याबरोबर जे सगळे लोक पकडले गेले होते त्यांना मुक्त करून स्वतःच्या नोकरीत ठेवण्यात यावे. या अर्जावर औरंगजेबाने हुकूम फर्मावला की त्यांना एकदा समक्ष हजर करून मग नोकरीत ठेवण्यात यावे.(ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक ४९) आपल्या लोकांप्रती नेतोजींची असलेली काळजी आणि त्यांना मोगली कैदेतून सोडवायचे त्यांनी केलेले प्रयत्न हे या अखबारातून स्पष्ट दिसून येते.

यानंतर २४ जुलै १६६७ च्या अखबारातली नोंद खूपच महत्वपूर्ण आहे. इथे आपल्याला असे कळते की नेतोजींना पकडल्या नंतर सुमारे एक वर्षाने त्यांच्या कुटुंब कबिल्याला सुद्धा दिल्लीस नेण्यात आले. त्यावेळेस नेतोजींप्रमाणे त्यांच्या बायकोने सुद्धा इस्लाम पत्करला असे दिसते. इस्लाम पत्करल्यानंतर औरंगजेबाने नेतोजींचा व त्यांच्या बायकोचा इस्लामी पद्धतीने निकाह लावून देण्याचा हुकूम दिला (ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक ७४ )

आता नेतोजींनी अटक होऊन एक वर्षापेक्षा एक वर्ष पूर्ण झालं होतं. १७ ऑक्टोबर १६६७ ला पुन्हा एकदा नेतोजींचा अर्ज आपल्याला सापडतो त्यात त्यांनी कोणी एक कोकोजी नावाच्या आपल्या मराठा साथीदाराला कैदेतून मुक्त करायची व आपल्या सेवेत ठेवण्याची विनंती औरंगजेबाकडे केली होती. वर आलेल्या अर्जाप्रमाणे कोकोजींनाही दरबारात पेश करून मग नोकरी ठेवले गेले असे दिसते(ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक १०५)

दोन दिवसानंतर च्या म्हणजे १९ ऑक्टोबर १६६७ ला पूर्ण सरंजम, पोशाख, झेंडा, हत्ती-घोडे इत्यादी बहाल करून त्यांची रवानगी काबूलला करण्यात आल्याची हकीगत आपल्याला कळते (ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक १०६)


निसटण्याचे प्रयत्न आणि शेवटी स्वगृही परत

अशा रीतीने औरंगजेबाने नेतोजींना काबुलच्या मोहिमेवर धाडून त्यांना स्वराज्यापासून जितके शक्य आहे तितके लांब पाठवले. शक्यतो नेतोजी , शिवाजी महाराज आणि स्वराज्य हे गणित पुन्हा कधीच जमू नये याची पूर्ण खबरदारी औरंगजेब घेत होता. आपल्या मायभूमीपासून इतके लांब जायला लागल्यामुळे नेतोजींच्या मनातही खंत असणार. मनूचीच्या नोंदीनुसार नेतोजी काबूलमध्ये असताना एकदा त्यांनी मोगल सैन्याला गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा हा प्रयत्न काही यशस्वी ठरला नाही. त्यांना पकडून कैदेत टाकून पुन्हा एकदा लाहोरला आणण्यात आलं. मनुची म्हणतो की कैदेतून सुटण्यासाठी नेतोजींसमोर धर्मांतराची अट ठेवण्यात आली. म्हणजे वर आलेल्या धर्मांतराच्या हकीकतीपेक्षा इथे थोडसं वेगळं वर्णन आले आहे. अर्थात वरील हकीकत ही मुघल दरबाराच्या अखबारांमधून आलेली असल्यामुळे तिची विश्वासार्हता मनुचीच्या वर्णन पेक्षा कितीतरी जास्त आहे. पुढे मनुची म्हणतो की धर्मांतराचे नाटक करून नेतोजींनी आपली मनसब परत मिळवली परंतु त्यांना पुन्हा एकदा सिंधू नदीपलीकडे पाठवण्यात आले. या घटनेच्या थोड्या महिन्यानंतर नेतोजी अचानक गायब झाले आणि स्वराज्यात येऊन शिवाजी महाराजांकडे दाखल झाले(Storia Do Mogor - खंड २ पान २०१ )

समकालीन मोगल इतिहासकार खफीखान हा सुद्धा आपल्याला नेतोजींची संपूर्ण हकीकत संक्षिप्त रुपात सांगतो. खफीखानच्या नोंदीनुसार नेतोजी आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही अटक करून औरंगजेबाकडे पाठवण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिशय कडक पहारा ठेवण्यात आला. शेवटी दुसरा काहीच उपाय चालत नाही असे बघून नेतोजी हे धर्मांतराला तयार झाले. त्यांच्या या निर्णयामुळे औरंगजेबाने त्यांना तीन हजाराची मनसब आणि दोन हजार घोडे आणि त्याच बरोबर मोहम्मद कुली खान हा किताब दिल्याचे खाफीखान म्हणतो. त्यानंतर मात्र मधले काही वर्णन न देता थेट नेतोजी दिलेरखानाच्या सैन्यात असताना संधी साधून पळून जाऊन स्वराज्यात दाखल झाल्याची हकीकत आहे. ( मुंतुखाब-उल-लुबाब : औरंगजेब राजवट ९वे वर्ष  )

नेतोजींना अटक झाल्यानंतर साधारण नऊ वर्षांनी त्यांची रवानगी पुन्हा दक्षिणेत आणि पुन्हा स्वराज्यात झाली. यावेळी दिलेरखान हा मोगलांचा दक्खनचा सुभेदार होता. त्याच्या फौजेत रुजू होण्यासाठी नेतोजींची रवानगी झाली असावी. आलेली ही सुवर्णसंधी साधून नेतोजींनी मोगली फौजेतून पळ काढला आणि आपल्या मातीत, आपल्या माणसांमध्ये ते पुन्हा एकदा येऊन पोचले. जेधे शकावलीतल्या नोंदीनुसार ११ जून १६७६ रोजी "नेताजी पालकर याने प्रायश्‍चित्त घेतले आणि ते शुद्ध झाले". अशा रीतीने नेतोजींचा मोगलाईतील प्रवास संपून ते पुन्हा स्वगृही, शिवाजी महाराजांकडे आणि स्वराज्यात दाखल झाले.

इंग्रज सुद्धा आपल्या एका पत्रात या घटनेची दखल घेतात. २४ जुलै १६७६ ला इंग्रजांच्या राजापूर वखारी होऊन सुरतेला पाठवलेल्या पत्रात ते लिहितात की शिवाजीचा एक नेतोजी नावाचा मुत्सद्दी परत त्यांना येऊन मिळाला आहे. नेतोजींचे वर्णन करताना इंग्रज लिहितात की तिथे दहा वर्ष मुघल दरबारात होते, तसेच त्यांचे धर्मांतर झाले होते परंतु आता त्यांना पुन्हा हिंदू करून घेतले आहे. पुढे याच पत्र इंग्रज असा संशय व्यक्त करतात की या सगळ्या प्रकरणात शिवाजी महाराजांचा काहीतरी मोठा कट शिजत आहे परंतु आत्ता कोणालाही त्याची कल्पना नाहीये (English Records on Shivaji Vol 2 - 175)

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा नेतोजी पालकर हे स्वराज्यातील खूप महत्त्वाचे असे व्यक्तिमत्त्व होतं याचा प्रत्यय आपल्याला २२ जुलै १६८१ च्या अखबारात मिळतो. इथे अशी नोंद आहे की औरंगजेबाचा शहजादा अकबर जो संभाजी महाराजांना येऊन मिळाला होता त्याचा मुक्काम तळकोकणात होता. त्यावेळी नेतोजी पालकर यांना महाराजांनी खास अकबर बरोबर व्यवस्था पाहण्यासाठी ठेवले होते (ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ लेखांक २२४)

तर असा हा मुघल ऐतिहासिक साधनातून आपल्याला दिसणारा नेतोजींचा मोगलाईतील प्रवास. ह्या पराक्रमी आणि महाशूर योध्याला दुर्दैवाने झालेली अटक, स्वराज्यापासून दूर ९ वर्ष केलेली त्यांची रवानगी आणि त्यातही त्यांचे पळून जाऊन मायभूमीत परत यायचे प्रयत्न हे सर्व आपल्याला या मुघल साधनातून बघायला मिळते. जेव्हा नेतोजी दिलेरखानाच्या फौजेतून परत शिवाजी महाराजांना भेटले असतील तेव्हा आपल्या या शूरवीर मर्द गड्याला बघून महाराजांना काय आनंद झाला असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. असा अनुभवी माणूस आणि व्यक्तिमत्व याचे महत्त्व ओळखून महाराजांनी त्यांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. स्वराज्याच्या या रणझुंजार आणि अतिपराक्रमी सरसेनापतीला त्रिवार मुजरा !!!

Comments


कुठलाही लेख किंवा अन्य माहिती कॉपी करू नये - सर्व हक्क सुरक्षित

नवीन लेख आणि अन्य माहिती च्या नोटिफिकेशन साठी subscribe करू शकता  

Subscribe केल्याबद्दल धन्यवाद !!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
Site Logos.png

महत्वाची सूचना - कुठल्याही लेखातल्या माहितीचे परवानगीशिवाय कृपया अनुकरण करू नये - तसेच कुठल्याही लेखातला मजकूर किंवा कुठलीही इमेज कॉपी करू नये - #History Blog #सह्याद्रीचे स्वराज्य

bottom of page