स्वराज्याची बदलत गेलेली युद्धनीती
- आदित्य गोखले
- Jun 19, 2024
- 10 min read
शिवाजी महाराजांनी जे तेजस्वी स्वराज्य उभं केलं त्याच्या उभारणीसाठी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक लढे द्यावे लागले. आणि लढाया सुद्धा साध्या नाहीत तर फार बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत मराठा फौजेला लढावे लागले. कालांतराने ह्या लढाई आणि युद्धांचे स्वरूप हे बदलत गेले. संभाजी महाराजांच्या काळात आपल्याला या लढ्यांमध्ये झालेले बदल दिसतात आणि संभाजी महाराजांनंतर तर युद्धाचे स्वरूप संपूर्णतः बदलले. या लेखात आपण शिवाजी महाराजांच्या प्राथमिक लढाया पासून ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या आगमनापर्यंत युद्ध स्वरूप आणि युद्धनीती ह्याच्यात परिस्थितीनुसार कसे बदल घडत गेले याचा थोडासा मागोवा घेणार आहोत
शिवकालाचा पूर्वार्ध - अग्रा भेटी पर्यंत
ह्या काळात शिवरायांनी शून्यातून स्वराज्य उभे केले. निश्चितच हा काळ युद्ध आणि लढायांच्या दृष्टीने एक सर्वाधिक खडतर असा काळ होता. ह्या काळात मातब्बर शत्रू चोहोबाजूंनी आ वासून होते. तसेच महाराजांचे स्वतःचे सैन्यही तेवढे जास्त नव्हते. मावळच्या दर्याखोऱ्यातून जमवलेली आपली मावळ्यांची फौज आणि त्या फौजेला नेहमीच अतिशय बळकट असे संरक्षण पुरवणारा उभा सह्याद्री - हेच तेवढे महाराजांचे बाजूने उभे होते. अफजल खान स्वारी वेळी साधारण १०००० घोडदळ आणि १०००० पायदळ अशी फौज असावी असा संदर्भ मिळतो (सभासद बखर).
समोर प्रचंड सैन्यबळ असलेले एकाहून अनेक शत्रू . ह्यांना जर तोंड द्यायचे तर केवळ एकच युद्धनीती प्रभावी ठरणार होती - ती म्हणजे गनिमी कावा. आणि या गनिमी काव्याचे नियोजन करणारा सेनानायक होता - अतिशय हुशार आणि प्रसंगावधानी असे शिवाजी महाराज.
महाराजांनी आपल्याला गनिमी काव्याची जगातील सर्वात उत्तम अशी काही उदाहरणे दिली. अफजल वधानंतर लगेच अगदी थोड्या दिवसात एक झंझावाती धडक मारून थेट पन्हाळ्या पर्यंत प्रदेश काबीज करण्यात आला. धक्का बसलेल्या अवस्थेत असलेल्या शत्रूला सावरण्याचा अजिबात वेळ न देता झडप घालण्याचा हा अत्यंत हुशार आणि धोरणी डाव !!! मोजकीच फौज हाताशी घेऊन शत्रूला सगळ्यात जास्त नुकसान कसे पोहोचवावे ह्याची ही उत्तम उदाहरणे :
१. अफजल खान भेटी नंतर जावळीचे युद्ध
२. अफजल प्रसंगानंतर फाजल खान आणि रुस्तमेजमान यांच्याशी कोल्हापूर जवळ युद्ध
३. उंबरखिंडीत कारतलब खानशी संग्राम
शिवकालाचा उत्तरार्ध - आग्रा भेटी नंतर
ह्या काळात सुद्धा अनेक महत्त्वाचे संग्राम झाले. पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले १६७०-७१ह्या काळात मराठ्यांनी परत घेतले. ह्या काळातला एक संस्मरणीय लढा म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी अजरामर केलेले सिंहगडचे युद्ध. एखाद्या किल्ल्याला तळहाता सारखे ओळखणे म्हणजे काय हे ह्या लढाईतून आपल्याला दिसून येते. किल्लेदार उदयभान राठोड याच्या ध्यानीमनीही नव्हतं अशा भागातून किल्ल्याची चढाई करून केवळ काही मावळ्यांनिशी अख्खा गड फते करणे म्हणजे गजबच. अनेक लढाया आणि अनेक छोटी मोठी युद्धे ह्या काळात लढली जात असताना एक लढाईने मराठा फौजेच्या युद्धशैलीला एक ऐतिहासिक अशी कलाटणी दिली. ही लढाई म्हणजे किल्ले साल्हेरची निर्णायक लढाई. स्वराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोकळ्या मैदानात शत्रूसमोर मराठा फौज उभी ठाकली होती. सभासद म्हणतो तसं ही लढाई इतकी भीषण होती की युद्ध सुरू होताच पृथ्वीचा धुराळा असा उडला की तीन कोश औरत चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते. (सभासद बखर). ह्या युद्धातला विजयाने हे सिद्ध झाले की फक्त गनिमी कावा आणि डोंगरातच नाही - तर ज्यावेळी उघड्या मैदानात समोरासमोरची लढाई होईल तेव्हाही मराठा फौज मुघलांना बरीच वरचढ होती.
महाराजांचा राज्याभिषेक झाला - आपले शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एक महाकाय मोहीम हाती घेतली. आता शत्रूची परिस्थिती बघा. आदिलशाही ही बहलोलखानाच्या मृत्यूनंतर बरीचशी खिळखिळी झाली होती. मुघलच आता स्वराज्याचे एकमेव प्रबळ शत्रू म्हणून समोर उभे होते. अशावेळी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेऊन कर्नाटकाचा प्रदेश तसेच थेट जिंजीपर्यंतचा प्रदेश काबीज केला आणि तो स्वराज्याला जोडला. म्हणजे आता यापुढे मराठा फौजेला केवळ सह्याद्री मध्ये नाही तर कर्नाटक-तमिळनाडूच्या मैदानी प्रदेशातील लढाया कराव्या लागणार होत्या.
संभाजी महाराजांचा काळ - गनिमाचा स्वराज्याला गराडा
सभासद म्हणतो की शिवाजी महाराजांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूच्या वेळी एक लाख पायदळ आणि सुमारे एक लाख पाच हजार घोडदळ अशी सैन्य संख्या होती(सभासद बखर). . याशिवाय मराठा नौदल हे शत्रूस तोडीस तोड टक्कर देत समुद्री मार्ग सुरक्षित ठेवत होते. म्हणजे संभाजी महाराज जेव्हा जून १६८० मध्ये रायगडावर परत आले तेव्हा स्वराज्याचे सैन्यबळ हे जवळजवळ दोन लाखाच्या घरात होते असे दिसते.
आता थोडी संभाजी महाराजांच्या वेळची गनिमाची हालचाल आणि परिस्थिती बघू. शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब हा दिल्लीला बसून एकानंतर एक सरदार स्वराज्यावर पाठवत असे. महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांचे हे स्वराज्य संपवण्याच्या हेतूने तो खुद्द भली मोठी फौज घेऊन दक्षिणेत उतरला होता. म्हणजे हा मुघल सेना समुद्र तर होताच तसेच पश्चिमेच्या समुद्रात जंजिरेकर सिद्धि आणि दक्षिणेत गोव्याला पोर्तुगीज अशी गनीमाची तिहेरी आघाडी संभाजी महाराजांच्या शासन काळाच्या सुरुवातीला तयार झाली होती.
१६८० ला संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळल्यानंतर आणि औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर मुघलांनी स्वराज्यविरुद्ध अनेक आघाड्या उभारल्या. कल्याण-भिवंडी मार्गे उत्तर कोकणात तसेच दक्षिणेकडून पन्हाळा आणि रामघाटाचा मार्गे तळकोकणात बऱ्याच मोहिमा पाठवल्या गेल्या. तसेच नाशिक, सोलापूर , औरंगाबाद अशा स्वराज्याच्या सीमावरती भागांवरून सुद्धा औरंगजेबाने अनेक सरदारांना स्वराज्यावर स्वराज्यावर पाठवले. परंतु १६८५ पर्यंत प्रचंड सह्याद्री स्वराज्याच्या पाठीशी उभा असल्यामुळे मुघलांना एकाही मोहिमेत यश मिळाले नाही. ह्या उलट मराठा फौजेने अवघड घाटवाटाच्या डोंगरदऱ्यात गनिमाला गाठून त्यांची वेळोवेळी दाणादाण उडवून दिली. म्हणजे १६८० ते १६८५ ह्या काळात औरंगजेबाला चांगलीच कल्पना आली होती की सह्याद्री पाठीशी असताना संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेणे हे अशक्यप्राय काम होते.
ह्या काळात सैन्य हालचाल आणि डावपेच यांच्या दृष्टीने दोन गोष्टींची येथे दखल घेतली पाहिजे. पहिली म्हणजे जंजिरेकर सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज ह्या स्वराज्याच्या शत्रूंना संपवण्यासाठी संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या होत्या. १६८३ च्या पोर्तुगीजांच्या विरुद्ध मोहिमेत तर मराठा फौजेने थेट गोव्यात धडक दिली होती. पण दुर्दैवाने ह्या दोन्ही मोहिमा संभाजी महाराजांना आटोपत्या घ्यावा लागल्या. जंजिरा मोहिमेच्या वेळी हसन अली खान हा कल्याणवर चालून आल्यामुळे महाराजांना परत रायगड वर माघारी फिरवू लागले.. तसेच गोवा मोहिमेच्या वेळी आता पोर्तुगीजांना संभाजी महाराज त्यांचा संपूर्ण फडशा पाडणार अशी पक्की खात्री बसत असतानाच मुघल शहजादा शाह आलम हा रामघाट उतरून कोकणात उतरला होता. त्याचवेळी शहाबुद्दीन खानाच्या नेतृत्वाखाली दुसरी एक फौज उत्तर कोकणातून रायगडाकडे निघाली होती. मुघलांच्या या दुहेरी आक्रमणाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांना गोवा मोहीम सोडून परत रायगडाकडे जावे लागले.( मराठा रियासत - उग्रप्रकृती संभाजी , शिवपुत्र संभाजी - कमल गोखले )
दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी आपल्याला असे दिसून येते की मराठा फौजेने सुध्दा मोघलांच्या प्रदेशात काही ठिकाणी छापे मारायला सुरुवात केली होती. १६८१ मध्ये बुऱ्हानपूर हल्ला करण्यात आला(जेधे शकावली) तसेच १६८५ मध्ये धारणगाव व इतर १७ धनसंपन्न शहरांवर आक्रमण करण्यात आले ( मराठा रियासत - उग्रप्रकृती संभाजी ). म्हणजे युद्ध केवळ स्वराज्यापुरतं मर्यादित न ठेवता मुघलांच्या प्रदेशातील ही लढाई पोहोचवण्याचा हेतू दिसून येतो.
साधारण १६८५ चा पावसाळा ते १६८९ च्या सुरुवातीला संभाजी महाराज कैद होईपर्यंत दुर्दैवाने कुठल्याही वर्षात मोठ्या मोहिमेचे किंवा लष्करी हालचालींचे संदर्भ आपल्याला मिळत नाहीत. १६८६-८७ मध्ये औरंगजेबाचा रोख हा प्रामुख्याने स्वराज्यावर नव्हता, परंतु ह्या काळात त्याने आदिलशाही व कुतुबशाही संपुष्टात आणली. एक महत्त्वाची घटना ह्या काळात घडली - ती म्हणजे वाईच्या आसपास युद्धात मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातीर्थ पडले.( मराठा रियासत - उग्रप्रकृती संभाजी ) मराठा फौजेसाठी हा एक मोठा धक्काच म्हणावा लागेल, कारण असे पराक्रमी व धोरणी नेतृत्व हे आता हरपले होते.
राजाराम महाराजांची कारकीर्द (१६८९ ते १७००) - पलटवाराची सुरुवात
स्वराज्याच्या छत्रपतीला एका बेसावध क्षणी कैद, त्यानंतर स्वराज्याच्या नव्या युवा छत्रपतींना रायगड सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून जिंजीला जावे लागले. मुघल फौज ही संभाजी महाराजांच्या काळातच स्वराज्याला चिकटून बसली होती. आता ही फौज स्वराज्यात सर्वत्र घुसली आणि बराचसा प्रदेश आणि किल्ले त्यांच्या हातात लागले(जेधे शकावली). राजाराम महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात हा मराठा स्वराज्याचा सर्वात खडतर आणि महाकठीण असा काळ म्हणावा लागेल. रामचंद्रपंत अमात्य ह्यांना हुकूमतपनाह हा किताब देऊन त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या स्वराज्याची जबाबदारी सोपवण्यात आली. राजाराम महाराज आणि राजमंडळातले इतर काही लोक - जसे प्रल्हाद निराजी वगैरे हे जिंजीला असल्यामुळे आता जिंजी ही स्वराज्याची प्रशासकीय राजधानी झाल्यासारखे होते.
सैन्याच्या हालचाली आणि युद्धनीती ह्या दृष्टीने हा काळ गाजवला तो मराठा फौजेच्या दोन महायोद्धांनी - सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. ह्या दोन वीरांनी महाराष्ट्र ते कर्नाटक ते जिंजी अशा मोठ्या युद्ध प्रदेशात मोगली फौजेला जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे चोपून काढले. मुघल सैन्य स्वराज्यात घुसल्यामुळे मराठा सैन्य हे एकसंध ठेवून काही नियोजित मोहिमा आखणे त्यावेळी शक्य नव्हते. परंतु रामचंद्रपंत अमात्य आणि सचिव शंकराजी नारायण यांच्या कुशल नियोजनामुळे आणि संताजी घोरपडे -धनाजी जाधव यांच्या अचाट पराक्रमामुळे मराठी फौजेने ह्या काळात स्वतःला आणि स्वराज्य सावरत मोगलांवर प्रचंड प्रतिहल्ला चढवला.
ह्या काळची युद्धनीती जर आपण बघितली तर असे जाणवते की राजाराम महाराज आणि रामचंद्रपंत ह्यांना एक मोठा फरक करावा लागला. वेगवेगळ्या मराठा सरदारांना छोट्या मोठ्या मोहिमा यशस्वी करण्याबद्दल प्रोत्साहन त्यांनी दिलेच, परंतु त्याच्या बदल्यात त्यांना त्यांचं जागीर किंवा मोकासा हे देण्याची पद्धत यावेळी परत चालू झाली. शिवाजी महाराजांनी बंद केलेली ही पद्धत परत चालू करण्यात थोडा नाईलाजाचा भाग होता कारण ह्या पद्धतीमुळे मराठा सैन्यात परत एकदा चैतन्य जागे होऊन त्यांनी ह्या कठीण परिस्थितीत मुघलांची पीछेहाट केली.
ह्या काळातली अजून एक गोष्ट जाणवते म्हणजे की युद्ध क्षेत्र आता महाराष्ट्र पुरते मर्यादित न राहता ते महाराष्ट्र-कर्नाटक-तमिळनाडू असे पसरले होते. संग्रामाचा हा काळ गाजवला तो निर्विवादपणे संताजी व धनाजी या जोडीने. अत्यंत वेगाने खाल्ले करणे व गनिमी काव्याचा उपयोग करून शत्रूला झोडपणे याच्यात संताजी व धनाजी पटाईत. त्यांचे प्रतिहल्ले आणि ते कधी कुठल्या भागात मुघल सेनेवर बरसतील याचा अंदाज नाही. त्यामुळे मुघल सैन्यातही त्यांची बरीच दहशत पसरली. मराठ्यांचे विजेच्या चापळतेने केलेले हल्ले , त्यांनी मारलेल्या झडपा आणि गनिमी कावा - यामुळे आता औरंगजेबाला इतक्या मोठ्या युद्ध क्षेत्रावर लक्ष द्यायला लागत होते की गोष्टी हळूहळू त्याच्या नियंत्रण बाहेर जाऊ लागल्या होत्या.
राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या एक दीड वर्ष आधीची एक महत्त्वाची घटना येथे अवश्य सांगितली पाहिजे. १६९९-१७०० मध्ये कृष्णा सावंत नावाच्या मराठी सरदाराच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी पहिल्यांदा नर्मदा ओलांडून मुघल प्रदेशावर हल्ला केला(तारिक-ए-दिलकुशा : औरंगजेब राजवट वर्ष ४२) . ही घटना अतिशय महत्वाची - कारण पुढच्या युद्धनीतीतल्या लांबलांबच्या मुघल सुभ्यांवर केलेला हल्ल्यांची ही जणू ब्लू प्रिंट होती.
महाराणी ताराबाईंची चलाख युद्धनीती - मुघल जेरीस (१७०० ते १७०७)
मार्च १७०० मध्ये राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सर्व प्रकारे आली ती महाराणी ताराबाईंच्या खांद्यावर. आपल्या पाच वर्षाच्या मुलाला अर्थात शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा सर्व कारभार आपल्याकडे घेतला. पुन्हा एकदा औरंगजेबाला स्वराज्य संपण्याची संधी दिसू लागली. यावेळी त्याच्या डोक्यात एक गजब गोष्ट आली. स्वराज्याचा आत्मा म्हणजे त्याचे गडकिल्ले आणि तेच काबीज केले तर स्वराज्य आपोआप संपेल अशी त्याची धारणा होती. त्यामुळे तो स्वतः आता या किल्ले मोहिमेवर निघाला.
आपण लक्षात घेतलं पाहिजे की इसवी सन १७०० च्या काळात मराठा फौजेची आणि बऱ्याच अंशी मुघल फौजेचीही मानसिकता ही पूर्णपणे बदलायला लागली होती. एकीकडे मराठा फौजेने आपल्या चपळ हल्ल्यांनी मुघल फौज आणि बादशहाला हैराण करून सोडले होते. दुसरीकडे मुघल सैनिकांना आता हे कळून चुकले होते की जे कार्य वीस वर्षाच्या काळात जमले नाही ते आता पुढे जाऊन काही जमण नाही. त्यामुळे महाराणी ताराबाईंच्या काळात मराठा फौजेची स्थिती हळूहळू पण निश्चितपणे वरचढ होत गेली. दुसरीकडे औरंगजेबाची विफलता आणि मोगल सैन्याची प्रकर्षाने पिछेहाट होऊ लागली.
ह्या काळातली युद्धनीती सर्वात वेगळी होती आणि त्याची स्फूर्ती निश्चितच होत्या महाराणी ताराबाई. ह्या युद्धनीतीचे दोन प्रमुख अशी वैशिष्ट्ये होती :
१. औरंगजेबाची किल्ले मोहीम एकूण इतिहास बघता शेवटी मराठ्यांच्या पथ्यावरच पडली असं म्हणायला लागेल. त्या काळात त्यानी १७०१ मध्ये पन्हाळा, १७०२ मध्ये विशाळगड , १७०३ मध्ये सिंहगड,राजगड,तोरणा अशा विविध मोहिमा राबवल्या. स्वराज्याची मंडळी फार चलाख -. अशा मोहिमा काढायला आणि त्या सुरू होईपर्यंत त्यांनी कधी औरंगजेबाला थोडाही प्रतिकार केला नाही. त्यांची युद्धनीती ही अतिशय स्पष्ट होती :
शक्यतो पावसाळ्यापर्यंत ज्या किल्ल्याला वेढा पडला आहे त्या किल्ला तो किल्ला लढवायचा - मग किल्ला मुघलांच्या हाती देण्यासाठी त्यांच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि किल्ला त्यांच्या स्वाधीन करून टाकायचा - मुघलांनी पावसाळ्यामध्ये किल्ल्यात रसद आणि इतर सामग्री भरली आणि औरंगजेबाच्या किल्ल्याकडे पाठ फिरली ती तो किल्ला झडप घालून परत स्वराज्यात सामील करायचा !!
पन्हाळा किल्ला २८ मे १७०१ ला (मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४४), विशालगड या तारखेला(मस्सीर-ए-अलामगिरी-७ जून १७०२ , मुंतुखाब- - उल-लुबाब - १६ जून १७०१ , ग.प्र.शक मध्ये ५ जून १७०२), सिंहगड ८ एप्रिल १७०३ ला(मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४७) आणि राजगड १६ फेब्रुवारी १७०४ ला (मस्सीर-ए-अलामगिरी - औरंगजेब राजवट वर्ष ४८) मुघलांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रत्येक वेळी किल्ला स्वाधीन करताना प्रचंड पैसे घेण्यात आले. हे सर्व किल्ले पुढे परत स्वराज्यात आले त्यामुळे ही किल्ले मोहीम कितपत यशस्वी म्हणावी असा प्रश्न पडतो
बर पन्हाळगड आणि विशाळगड हे जिंकल्यानंतर औरंगजेब तेव्हा छावणीकडे परतत होता तेव्हा त्याच्या सैन्यावर , जोराचा पाऊस पडत असताना आणि नद्या ओढ्यांना पूर आले असताना, बिकट परिस्थितीत प्रचंड हल्ले चढवण्यात आले.
२. दुसरी एक खूपच महत्त्वाची युद्धनीती ह्या काळातली होती ती म्हणजे मोगली सुभ्यांवर आक्रमण करणे. वर सांगिल्याप्रमाणे १६९८ मध्ये पहिल्यांदा मराठा फौजेने नर्मदा पार करून मोगली प्रदेशावर आक्रमण केले होते.. पण महाराणी ताराबाईंच्या काळात - मुख्यत्वे १७०० ते १७०५ ह्या काळात मराठा सैन्याने दक्षिणेतल्या आणि गुजरात मधल्या सर्व मोगली सुभ्यांवर आक्रमण केल्याचा नोंदी सापडतात. मराठा फौजेचा आत्मविश्वास यावेळी इतक्या उंचीवर होत आहे की त्यांनी 30 ते 40 हजार फौजा घेऊन वेगवेगळ्या सरदारांच्या नेतृत्वाखाली भागानगर, गुजरात, माळवा, विजापूर ते थेट मछलीपटणम पर्यंत मोगली प्रदेशावर हल्ले चढवले. म्हणजे आता युद्धभूमी ही केवळ स्वराज्याची भूमी न राहता हा युद्धाचा वणवा आता मोगल प्रदेशात पूर्णपणे पसरला होता. ह्या मुघल प्रदेशांवर आक्रमण करून त्यांच्याकडून चौथ वसूल करून मराठा सैन्य आता मुघलांना जेरीस आणत होते.
युद्ध आता पूर्णपणे औरंगजेबाच्या हाताबाहेर गेले होते. असे वाटल्याशिवाय राहत नाही की त्याला ह्यावेळी दिल्लीची खूप आठवण झाली असेल. याउलट स्वराज्याच्या फौजा ह्या काळात हळूहळू पण नक्कीच वरचढ होऊन बसल्या होत्या. आता औरंगजेब किंवा मुघल सैनिक यांची म्हणावी अशी काहीच दहशत राहिली नव्हती.
मुघल फौजेची दयनीय अवस्था
१६८० पासून दिल्ली सोडून दक्षिणेत असलेली मुघल फौज आता गुडघे टेकायचेच बाकी होती. अनेक हल्ले, अनेक मोहिमा आणि अनेक डावपेच अखल्यानंतरही त्यांना म्हणावे तसे काहीच यश हाती लागले नव्हते. ह्या उलट मराठा सैन्य आता त्यांना वरचढ होऊन बसले होते. कधी कुठून मराठा फौजेचा हल्ला होऊन आपला खजिना आणि अन्नधान्य लुटले जाईल याची शाश्वती राहिली नव्हती. त्यावेळी मोगली फौजेबरोबर बराच वेळ असलेला आणि काही वेळा प्रत्यक्ष मुघल छावणीत असलेला इटालियन इतिहासकार निकोलाओ मनूची याने प्रत्यक्ष पाहिलेल्या मुघल छावणीच्या परिस्थितीचे अत्यंत भयानक वर्णन केले आहे(असे होते मोगल(मनूची) : पृ ४०१-४०२)

मनूची असेही म्हणतो की मुघल सरदार आणि अधिकारी हे लाचलुचपत,फसवाफसवी आणि वचनभंग करणे याच्यात पटाईत होते(असे होते मोगल(मनूची) : पृ ३७३). खोट्या विजयाच्या आणि कामगिरीचा बातम्या बादशाह पर्यंत पोचवून त्याच्याकडून बक्षीस उकळण्यातही ते वाकबगार होते. म्हणजे एकीकडे औरंगजेबाचे लक्ष हे स्वराज्य संपवणे असे असताना अंतर्गत त्याच्या फौजेमधे अशा अनेक भानगडी त्यावेळी चालल्या होत्या. २७ वर्ष अविरत चाललेले हे अपयशी युद्ध केवळ स्वतःच्या जिद्दीने औरंगजेबाने चालू ठेवले. शेवटी तर बहुतेक मानसिकरित्या त्याची फौजही त्याच्याबरोबर ह्या युद्धात सामील नव्हती. केवळ बादशहाच्या आदेशाचे ते पालन करत होते . अशा भयंकर निराशाजनक आणि अपयशी परिस्थितीतच १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला.
सारांश
आदित्य गोखले जी,
अभ्यासपूर्ण लेख, विचार करायला लावणारा आहे.
आपल्या सवडीनुसार संपर्कात राहायला आवडेल विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049
खूपच छान अभ्यासपूर्वक लेख. अजुन असे लेख वाचायला आवडेल..
-मंदार