संभाजी महाराज कैदेपूर्वी स्वराज्यातल्या घटना
- आदित्य गोखले
- May 16, 2023
- 6 min read
Updated: Feb 27
संभाजी महाराजांची छत्रपती म्हणून संपूर्ण कारकीर्द म्हणजे एक अजोड आणि तीव्र संघर्षाची कहाणी. ह्या नऊ वर्षाच्या कालखंडात स्वराज्याला मोगलरूपी संकटाने पूर्ण वेढले होते. तसेच पोर्तुगीज , जंजिरेकर सिद्दी वगैरे इतर छोटे शत्रू पण होतेच. १६८० ते १६८९ ची सुरुवात अशा साधारण नऊ वर्षाच्या काळात स्वराज्य अशा अनेक संकटांशी लढत होते. साधारण १६८५ पर्यंत औरंगजेबाने उघडलेल्या प्रत्येक मोहिमेचे आणि त्याने पाठवलेल्या प्रत्येक सरदाराला शेरास सव्वाशेर अशा रूपाने संभाजी महाराज व मराठा फौजेकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
एवढा मोठा फौजेचा पसारा असूनही म्हणावे तसे यश मिळत नाही हे बघून हताश झालेल्या औरंगजेबाने दक्षिणेतील इतर पातशाह्यांकडे आपले लक्ष वळवले. १६८६ मध्ये त्याने विजापूरवर हल्ला करून आदिलशाही संपुष्टात आणली. याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून १६८७ मध्ये त्याने भागानगर - गोवळकोंडाला वेढा घातला आणि कुतुबशाही संपवून तिथे आपले वर्चस्व स्थापन केले. तेव्हापासून त्याचे लक्ष फक्त आणि फक्त मराठा स्वराज्य आणि संभाजी महाराज यांच्याकडे होते. अखेर फेब्रुवारी १६८९ मध्ये जेव्हा संभाजी महाराज एका बेसावध क्षणी कैद झाले तेव्हा त्यांची छत्रपती म्हणून अतिशय संघर्षपूर्ण , कठीण आणि दैदिप्यमान अशी कारकीर्द संपुष्टात आली. १६८७-८८ ह्या शेवटच्या दोन वर्षातील सविस्तर माहिती दुर्दैवाने कोणत्याही मराठी साधनात आपल्याला मिळत नाही. बरीचशी माहिती ही मोगलांच्या समकालीन लेखनातून आपल्याला प्राप्त होते. त्यातून ह्या दोन वर्षातल्या काही लक्षणीय घटना आणि थोडाफार स्वराज्याचा परिस्थितीचा आपल्याला अंदाज येतो.
इथे आपण संभाजी महाराज यांना अटक कशी झाली किंवा त्यामागे कोण होते याची कारणमीमांसा करत नाहीये- तर अटकेपूर्वीच्या दोन वर्षात स्वराज्यात काय घटना घडत होत्या हे आपण बघणार आहोत
मोगलांच्या अनेक आघाड्या
१६८७ मध्ये व नंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांविरुद्ध अनेक आघाड्या उघडल्या. सर्व दिशांनी आपल्या वेगवेगळ्या सरदारांना नामजद करून स्वराज्यावर हल्ला करण्याची त्याने योजना आखली होती.
१. १६८८ च्या सुरुवातीपासूनच मोगलांचा नाशिकचा फौजदार मातबर खान हा सतत नाशिक-बागलाण तसेच घाट उतरून कल्याण-भिवंडी ह्या प्रदेशात मोहिमेवर होता. (नियतीच्या विळख्यात औरंगजेब - मातबर खान पत्रे)
२. शहजादा आजम ह्याला फौजेसह नाशिकच्या बाजूने स्वराज्यावर पाठवण्यात आले (मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - औरंगजेब राजवट वर्ष 34) - ह्याला मोगलांचा दरबारी इतिहासकार साकी मुस्तैदखान हा सुद्धा दुजोरा देतो आणि बरोबर चाळीस हजार सैन्य दिल्याची वार्ताही देतो (मराठे व औरंगजेब)
३. सरदार फिरोजजंग बहादुर ह्याला राजगड आणि आसपासचे किल्ले घेण्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते (मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - औरंगजेब राजवट वर्ष 34)
४. शेख निजामला - ह्यानेच पुढे संभाजी महाराजांना कैद केले - बरोबर फौज देऊन कोल्हापूर-पन्हाळा भागात स्वराज्याच्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते (मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - औरंगजेब राजवट वर्ष 34)
५. ह्या सर्वांव्यतिरिक्त ७ ऑगस्ट १६८८ ला मुल्फलतखानला "संभाजीचा मुलुख जिंकण्यासाठी" पाठवल्याचे नोंद आपल्याला मोगल दरबाराच्या अखबारात मिळते (मोगल दरबाराची बातमीपत्र खंड १)
आता मोगलांचा केवळ एकच शत्रू उरला असल्यामुळे अखंड स्वराज्यात अनेक चकमकी, हल्ले तसेच झटापटी सारख्या चालू होत्या. ह्यावेळी संभाजी महाराज आणि त्यांच्या संपूर्ण फौजेला चोहोबाजूंनी संपूर्ण सावधगिरी बाळगावी लागली असणार. अशा रीतीने कुतुबशाही संपवल्यानंतर मोगलांनी स्वराज्यविरुद्ध असंख्य अगणित आघाड्या उभारल्या होत्या.
संभाजी महाराजांची संभाव्य रणनीती
आता थोडी स्वराज्यातली परिस्थिती बघू - १६८७ ते १६८९ च्या सुरुवातीपर्यंतची स्वराज्याच्या सरदारांच्या हालचालींची खूप तपशीलवार माहिती मिळत नाही. या काळात आपल्याला असे दिसते की रायगड ते पन्हाळगड हा सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आणि त्याच्या बचावासाठी मराठा फौज झटत असावी.
१. खुद्द संभाजी महाराजांचे वास्तव्य हे १६८७-८८ मध्ये मुख्यत्वे रायगडावर होते असे दिसते. रायगड सोडून कुठेही मोठ्या मोहिमेवर अथवा दुसऱ्या ठिकाणी महाराज गेल्याची नोंद मिळत नाही. स्वतः रायगडावर राहून त्यांनी कवी कलश यांना विजापूरच्या मदतीसाठी तसेच केसो त्रिमल यांना कर्नाटकात पाठवले होते. कवी कलश - शिर्के भांडणानंतर महाराज कलशांच्या संरक्षणार्थ रायगडाहूनच आल्याची नोंद आहे (जेधे शकावली). म्हणजेच संभाजी महाराजांचे वास्तव्य हे या शेवटच्या दोन वर्षात बहुतांशी रायगडालाच होते असे दिसते.
२. १६८५ च्या जून-जुलै महिन्यात संभाजी महाराजांनी विजापूरच्या मदतीसाठी कवी कलशना पाठवल्याची नोंद मिळते(जेधे शकावली). तेव्हापासून १६८९ पर्यंत असे दिसते की कवी कलश हे पन्हाळा आणि विशाळगडच्या भागातच मुक्काम करून तिथूनच सैन्याची व्यवस्था इत्यादी बघत होते . शेवटी जेव्हा शिर्क्यांनी त्यांच्याविरुद्ध उठाव केला तेव्हा सुद्धा ते पळून जाऊन विशाळगडच्या आश्रयाला गेले होते (जेधे शकावली). संभाजी महाराज स्वतः शिर्क्यांविरुद्ध चालून आले आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८८ ला ते प्रकरण त्यांनी निपटवले. ह्या नंतर एकाच महिन्यांनी कवी कलशांच्या बोलण्यावरून महाराजांनी प्रह्लाद निराजी , काही सरकारकून आणि इतर बऱ्याच लोकांना कैद केले (जेधे शकावली)
३. स्वराज्याच्या कर्नाटकातल्या प्रदेशाची जबाबदारी संभाजी महाराजांनी हरजीराजे महाडिक यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी जिंजीहून या प्रदेशाची चांगली घडी बसवली होती. त्यांच्या मदतीसाठी १६८६ अखेरीस केसो त्रिमल यांना संभाजी महाराजांनी कर्नाटकात पाठवले आणि ११ फेब्रुवारी १६८७ ते येऊन हरजीराजे महाडिकांना मिळाले (जेधे शकावली). त्यामुळे असे दिसते की दक्षिणेकडच्या स्वराज्याच्या प्रदेशात मोगलांचा प्रतिकार चालू होता आणि किमान तिथे तरी स्वराज्याची व्यवस्था व्यवस्थित चालली होती
४. पेशवे निळोपंत पिंगळे यांनी १६८७ मध्ये सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या पत्रांवरून असे दिसते की स्वराज्याचे सर्वोत्तम सरदार असलेले सर्जेराव त्यावेळी मात्र आपल्या जमावानिशी मोगलांच्या सेवेत गेले होते.(संभाजीकालीन पत्रसारसंग्रह २१६,२१९). परंतु हे पत्र लिहिल्यानंतर सर्जेराव स्वराज्यात परत आले असे पौष १६८७ च्या जेधे.शक च्या नोंदीवरून आपल्याला कळते
५. रायगड आणि पन्हाळगड यांचा मधला सह्याद्रीचा अवघड प्रदेशात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वावर असावा असा कयास आहे. १६८७ मध्ये वाई जवळ सर्जाखानशी झालेल्या लढाईत हंबीररावांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला होता. एकूण असे वाटते की रायगड आणि पन्हाळगड यांच्या मधल्या प्रदेशाचा दुवा आणि जबाबदारी ह्या थोर सेनानी कडे सोपवण्यात आली होती - पण कुठल्याही कागदपत्रात हंबीररावांच्या हालचालींची नोंद नसल्यामुळे ठामपणे काही सांगता येत नाही
फितुरीचे विष पसरायला सुरुवात - अनेक किल्ले हातातून गेले
भरमसाठ प्रलोभन दाखवून फितुरी माजवायची औरंगजेबाची जुनी पद्धत होय. १६८७ पासून स्वराज्यात हा भयंकर रोग अजूनच बळावला आणि परिणामी अनेक किल्ले मोगलांच्या हातात सापडले
- १६८७ मे च्या महिन्यात बागलणातला सर्वात बलाढ्य किल्ला जो साल्हेर - त्याचा किल्लेदार असोजी हा औरंगजेबाच्या भेटीला गोवळकोंड्याला गेला. अनेक बक्षीसे व भेटवस्तू असा मानमरातब मिळवून त्याने साल्हेरचा किल्ला मोगलांच्या हाती सोपवला. (मराठे व औरंगजेब - औरंगजेब राजवट वर्ष ३०)
- पाठोपाठ सांगोल्याचा किल्लेदार माणकोजी यांनीही खिलतीची वस्त्रे आणि २००० व १००० स्वार मनसब स्वीकारून किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. (मराठे व औरंगजेब - औरंगजेब राजवट वर्ष ३०)
- २९ सप्टेंबर १६८८ च्या अखबारात मुल्फलतखानच्या फौजेतील नागोजीला एका किल्लेदाराचा - इकडे स्वारी केली तर किल्ला स्वाधीन करू - असा निरोप आल्याची नोंद आहे. हा किल्ला नेमका कोणता ह्याचा फारसा उलगडा होत नाही. (मोगल दरबाराची बातमीपत्र १). ह्या बातमीपत्रात पुढे खटाव पासून थोड्या दूर असलेल्या नारोगडाच्या पायथ्याशी मराठा फौजआणि मुल्फलतखानच्या फौजेची लढाई झाल्याची नोंद आहे
- ह्याच अखबारात माहुलीचा किल्लेदार ही किल्ला स्वाधीन करायला सशर्त तयार असल्याचे अब्दलकादर( मातबर खान) ह्याच्या अर्जाचीही नोंद मिळते. वर उल्लेख केलेल्या साल्हेरच्या किल्लेदार असोजी सारखी मनसब - ज्याच्यात ४०००० रोख, दहा घोडे, खिलतीची वस्त्र आणि दोन खेडी - ह्या सगळ्याची माहुलीच्या किल्लेदाराला अपेक्षा होती. (मोगल दरबाराची बातमीपत्र १)
- शिवाजी महाराजांचे जावई अचलाजी ह्याच्या फितुरीची आणि त्याला ५००० व २००० स्वार मनसब मिळाल्याची वार्ता ही साकी मुस्तैद खान देतो. आता हा अचलाजी नेमका कोण आणि तो शिवाजी महाराजांचा खरच जावई आहे का दुसरा कोणी सरदार आहे ह्याचा नीट पत्ता लागत नाही (मराठे व औरंगजेब - औरंगजेब राजवट वर्ष २९)
- ह्या व्यतिरिक्त सुद्धा स्वराज्याचे अनेक किल्ले मोगलांनी जिंकल्याची वार्ता आपल्याला अखबारातून मिळते. ७ एप्रिल १६८८ ला जव्हारचा राजा विक्रम पतंगराव यांनी कोहोज किल्ला जिंकण्याची नोंद आहे. १२ एप्रिल १६८८ ला नाशिकचा ठाणेदार ह्याने मार्कंडगड जिंकून घेतला. ७ ऑगस्ट १६८८ च्या बातमीपत्रात नुकत्याच जिंकण्यात आलेल्या सरसगड किल्ल्यावर किल्लेदाराच्या नेमणुकीचा उल्लेख येतो. तसेच ९ ऑगस्ट १६८८ ला हसन अली त्याने लढाई करून होलगड किल्ला जिंकल्याची नोंद आपल्याला मिळते. २९ सप्टेंबर १६८८ ला संभाजी महाराजांचा किल्ला सामानगड जिंकल्याच्या उल्लेख आहे(मोगल दरबाराची बातमीपत्र १)
नाशिक-बागलाण मोगलांची मुसंडी
१६८८ पासून मातबरखान मोगलांचा नाशिकचा फौजदार होता. हयावर्षी त्याने नाशिक-बागलाण भागात मोठी मुसंडी मारून अनेक किल्ले हस्तगत केले. ह्या मोहिमांसाठी त्याने खास कोळी, भिल्ल आणि मावळे लोक जमा करून त्यांची पथके तयार केली होती.
- १७ जानेवारी १६८८ ला मातबरखानाने पट्टा किल्ला जिंकला आणि या मोहिमेचा खर्च ४५००० आल्याचे औरंगजेबाला कळवले.
- त्यानंतर त्याचा मोर्चा वळला तो कुलंग किल्ल्याकडे. हा किल्ला जिंकायला अवघड होता त्यामुळे मातबरखानाने एक वेगळीच शक्कल लढवली - शिबंदीची बायक-मुले त्यावेळी प्रबळगडावर होती त्याने त्यांना धरून आणले आणि अशा रीतीने किल्ला मोगलांकडे गेला.
- त्यानंतर त्याने नाशिक-बागलाण परिसरातले औंढा व हरिहर किल्ले घेतल्याचे उल्लेख मिळतो. तसेच कवनाई, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत यांना वेढा घातल्याची ही नोंद मिळते. त्यामुळे ते किल्ले हे त्यांनी जिंकून घेतले असावे
- ८ जानेवारी १६८९ ला त्रिंबक किल्ला जिंकल्याचे मातबरखान एका पत्रात कळवतो - त्रिंबकचे किल्लेदार तेलंगराव आणि शामराज यांना मनसब आणि इतर बक्षीस देण्यात आल्याचा उल्लेख ही सापडतो.
अशा रीतीने १६८८ आणि १६८९ च्या सुरुवातीपर्यंत नाशिक-बागलाण या भागातले बरेचसे किल्ले हे मातबरखानाने जिंकून घेतले होते.
(नियतीच्या विळख्यात औरंगजेब - मातबर खान पत्रे)
ह्या २ वर्षातली किल्ल्यांची स्थिती तुम्ही येथे नकाशावर बघू शकता - इथे क्लिक करा
सारांश
Comments